पाकिस्तान बनला UNSC चा अध्यक्ष! हिंदुस्थानसाठी चिंतेची बाब?
मंगळवारी पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा (UNSC) अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. या वर्षी जानेवारीमध्ये पाकिस्तानची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा तात्पुरता सदस्य म्हणून निवड झाली. परिषदेचे अध्यक्षपद त्याच्या 15 सदस्य देशांमध्ये बदलत राहते. 5 स्थायी सदस्यांव्यतिरिक्त, या परिषदेत 10 तात्पुरते सदस्य आहेत.
संयुक्त राष्ट्रांमध्ये मोठा पाठिंबा मिळाल्याने पाकिस्तान सुरक्षा परिषदेचा तात्पुरता सदस्य म्हणून निवडून आला. पाकिस्तानला 193 पैकी 182 मते मिळाली. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, “पाकिस्तान ही जबाबदारी नम्रता आणि दृढनिश्चयाच्या भावनेने स्वीकारतो.” जुलै महिन्यात पाकिस्तान दोन महत्त्वाच्या उच्चस्तरीय बैठका आयोजित करणार आहे. पहिली बैठक 22 जुलै रोजी होणार असून, ती ‘आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यासाठी बहुपक्षीयता आणि शांततापूर्ण तोडगा’ या विषयावर असेल. दुसरी बैठक 24 जुलै रोजी ‘संयुक्त राष्ट्र आणि प्रादेशिक तसेच उप-प्रादेशिक संघटना: इस्लामिक सहकार्य संघटना (OIC)’ यावर केंद्रित असेल. या दोन्ही बैठका पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक दार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहेत.
हिंदुस्थानसाठी चिंतेची बाब?
पाकिस्तानच्या या नव्या भूमिकेमुळे हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढण्याची शक्यता काही माध्यमांनी व्यक्त केली आहे. हिंदुस्थानने नुकतेच संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानच्या दहशतवादाशी संबंधित भूमिकेवर टीका केली होती. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला दहशतवादाला प्रोत्साहन देणारा देश म्हणून संबोधताना, त्यांचे कृत्य उघड करण्याचा इशारा दिला होता.
काही हिंदुस्थानी माध्यमांमध्ये याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे की, पाकिस्तान आपल्या अध्यक्षपदाचा वापर हिंदुस्थानविरोधी मुद्दे पुढे रेटण्यासाठी करू शकतो. विशेषतः, कश्मीर प्रश्न आणि दहशतवादासंदर्भातील चर्चांमध्ये पाकिस्तान हिंदुस्थानतो लक्ष्य करू शकतो, अशी भीती आहे. काही तज्ज्ञांचे मत आहे की, UNSC चे अध्यक्षपद हे प्रतीकात्मक असून, त्याचा प्रत्यक्ष प्रभाव मर्यादित आहे, कारण कोणताही निर्णय घेण्यासाठी 15 सदस्य देशांपैकी किमान 9 देशांचा पाठिंबा आणि स्थायी सदस्यांचा व्हेटो नसणे आवश्यक आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List