प्रणाम वीरा- शरीर झाले विकलांग, पण जिद्द अथांग

प्रणाम वीरा- शरीर झाले विकलांग, पण जिद्द अथांग

>> रामदास कामत

कारगील युद्धात अतुलनीय शौर्य दाखवल्यानंतर पुढच्या ऑपरेशन पराक्रम मोहिमेवर जाण्यापूर्वी एक मोठा स्फोट होतो काय आणि त्या अपघातात या योद्धय़ाला दोन्ही पाय आणि एक हात गमवावा लागतो काय! जगण्याच्या आशा संपत आलेल्या असतानाच देशप्रेमाची ऊर्मीच त्याला उभं करते, आपल्यासारख्याच युद्धात विकलांग झालेल्या अनेक वीरांना मदतीचा हात देण्यासाठी. लान्स नायक दीपचंद सिंग यांच्या  कार्याला आमचा सलाम! 

मूळचे पंचग्रामी गाव, पाबडा, हरयाणा येथील आणि नंतर नाशिकजवळील देवळाली येथे वास्तव्यास असणारे व आर्टिलरीचे तोपची नायक दीपचंद सिंग यांचे कारगील युद्धात दाखविलेले शौर्य हे जसे कौतुकास पात्र आहे तसेच सध्या दोन पाय, एक हात गमावूनही इतर विकलांग जवानांसाठी ते जगत असलेले आयुष्यदेखील तितकेच प्रेरणादायी आहे.

एकूण सहा भावंडं असलेले दीपचंद 1994 मध्ये नाशिक येथे आर्टिलरीमध्ये भरती झाले. लहानपणापासून आजोबा धरमचंद नंबरदार यांनी शेतीकाम करत असतानाच आझाद हिंद सेना, सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याचे संस्कार दीपचंद यांच्यावर केले. ही सर्व शिदोरी घेऊन ते भारतीय सैन्यात दाखल झाले. नेताजी सुभाषचंद्र यांच्याकडून प्रेरणा घेतलेल्या दीपचंद यांची भारतीय सैन्यात 1889  मध्ये मिसाईल रेजिमेंट कारगीलमध्ये तोफखाना विभागात नियुक्ती झाली. प्रशिक्षणाच्या पहिल्याच दिवशी पोटदुखीने दीपचंद हैराण झाले. मात्र जिद्दीने त्यांनी सर्व प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. त्यानंतर दीपचंद यांची पहिली पोस्टिंग हुसेनीवाला बोर्ड, पंजाब येथे झाली. या वेळी त्यांनी ‘ऑपरेशन रक्षक’, जम्मू-कश्मीरमध्ये सहभाग घेतला. उरी सेक्टरमध्ये बारामुल्ला येथेही त्यांचे पोस्टिंग केले गेले.

दीपचंद यांच्या अंगी असलेल्या गुणांची पारख झाल्याने कश्मिरी भाषेच्या कोर्ससाठी त्यांची निवड करण्यात आली. दोन महिन्यांत त्यांनी कश्मिरी भाषा अवगत केली. त्यानंतर त्यांची नियुक्ती रेजिमेंटच्या गुप्तहेर खात्यात करण्यात आली. या वेळी त्यांनी कश्मिरी जनतेत मिसळत शिताफीने अतिरेक्यांची माहिती गोळा केली. ज्यामुळे कश्मीर खोऱयात सेना आपले ऑपरेशन यशस्वीपणे राबवू शकली. दीपचंद यांच्या संकलित माहितीच्या आधारावर दरगाव मोहल्ला हुडचक येथील कार्यवाहीत सिव्हिल बसमध्ये सैन्य दाखल झाले तेव्हा गाडीखाली लपलेले तीन कुख्यात अतिरेकी मारण्यात सैन्याला यश आले. दीपचंद यांनी आपल्या कश्मीर खोऱयातील दीड वर्षाच्या कालावधीत सहा ऑपरेशनमध्ये सहभाग नोंदवत आठ ते दहा अतिरेक्यांना कंठस्नान घातले.

कश्मीर खोऱयात सैन्य आपली कार्यवाही करत असतानाच ‘कारगील युद्ध’ सुरू झाले.  त्यांच्या युनिटला कारगीलकडे कूच करण्याचा संदेश मिळताच दीपचंद यांचे बाहू स्फुरण पावायला लागले. कारगील युद्धात टोलोलिंगवरच हल्ला करण्याची पहिली संधी त्यांना मिळाली. पहिलाच तोफगोळा योग्य ठिकाणी पडल्याने त्यांनी वापरलेला डाटा त्यानंतर सर्व आर्टिलरीला देण्यात आला. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱयांना सांगितले होते की, “अन्नाची रसद उपलब्ध असो वा नसो, दारूगोळा कमी पडता कामा नये.’’  कारगील युद्धात ते 17 हजार फूट उंचीवर असलेल्या ‘टायगर हिल’ येथे तैनात होते.  दीपचंद यांनी केवळ शत्रूंना पराभूत केले नाही, तर त्यांच्या अनेक साथीदारांचे प्राणही वाचवले. मिसाईल रेजिमेंटचा भाग असलेले दीपचंद यांनी ‘ऑपरेशन विजय’मध्ये टोलोलिंगवर गोळीबार करून शत्रूचे बंकर उडवून दिले होते.  जगातील सर्वात दुर्गम युद्धक्षेत्रातून पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून लावले, भारताने टोलोलिंग जिंकले आणि तिथे तिरंगा फडकावला.

पुढे ‘13 जम्मू-कश्मीर रायफल’, ‘18 ग्रेनेडियर’, ‘2 राजपुताना रायफल’ या युद्धात दीपचंद यांचा मोलाचा सहभाग होता. संसद हल्ल्याच्या वेळी दीपचंद हे राजस्थान सीमेवर तैनात होते. या वेळी दारूगोळा लावत असताना स्फोट झाला व त्यात त्यांचे दोन्ही पाय आणि एक हात निकामी झाले. त्या वेळी दीड वर्षाचा मुलगा व तीन महिने गर्भावस्था असणारी पत्नी अशी त्यांच्या कुटुंबाची स्थिती होती. युद्धात शौर्य गाजविणारा सैनिक चुकीने झालेल्या स्फोटात विकलांग झाला. मात्र राष्ट्रासाठी आपण लढलो याचे समाधान आणि अभिमान दीपचंदना आहे. त्यांच्या आतला योद्धा अजूनही पूर्ण उत्साहाने जिवंत आहे.

माजी सीडीएस जनरल बिपिन रावत यांनी दीपचंद यांना त्यांच्या शौर्यासाठी ‘कारगील योद्धा’ ही पदवीदेखील दिली आहे. दीपचंद सध्या आदर्श सैनिक फाऊंडेशनच्या माध्यमातून कर्तव्यादरम्यान अपंग झालेल्या सैनिकांच्या कल्याणासाठी काम करत आहेत.

 [email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कितीही मोठ्या बापाचा असू दे टायरमध्ये घालून झोडा, अजितदादांचे आदेश कितीही मोठ्या बापाचा असू दे टायरमध्ये घालून झोडा, अजितदादांचे आदेश
वाहतुकीच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. नियमांचे उल्लंघन करणारा माझा नातेवाईक असला तरी त्याला टायरमध्ये घालून झोडायला सांगणार आहे, असा इशारा...
बेळगावातील कन्नड सक्तीच्या विरोधात मराठी भाषिक रस्त्यावर उतरणार!
युरोपीय युनियन, मेक्सिकोवर टेरिफ बॉम्ब डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, 1 ऑगस्टपासून होणार लागू
रंगभूमी- चिंतन नियतीवादाचे
कृषिभान- वाटचाल कुपोषणाकडून उपोषणाकडे!
माधुरीला गुजरातला पाठवण्यास विरोध, हायकोर्टाने राखून ठेवला निकाल; कोल्हापुरातील जैन संस्थेच्या हत्तीणीच्या स्थलांतराला आव्हान
विशेष – ‘उत्तराधिकारी’ निवडीचे भूराजकीय पडसाद!