सायबर चोरांकडून तिघांना 24 लाखांचा ऑनलाइन गंडा
सायबर चोरट्यांनी पुणेकरांना अक्षरशः वेठीस धरले असून, दरदिवशी विविध प्रकाराचे आमिष दाखवून ऑनलाइनरीत्या गंडा घातला जात आहे. त्यामुळे सुशिक्षितांपासून ते अशिक्षित नागरिकांपर्यंत अनेकजण जाळ्यात अडकत असल्याचे फसवणुकीच्या घटनांवरून स्पष्ट झाले आहे. सायबर चोरट्यांनी तीन घटनांमध्ये तिघांची 23 लाख 85 हजार 93 रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी खडकी आणि खराडी पोलीस ठाण्यांत स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे.
शेअर ट्रेडिंग कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एकाची तीन लाख 90 हजारांची फसवणूक केली. ही घटना 25 डिसेंबर 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीत घडली असून, डेव्हिड जोसेफ व जेसिका नामक व्यक्तींसह विविध व्हॉट्सअॅप ग्रुप व बँक खातेधारकांविरोधात गुन्हा दाखल आहे. पोलीस निरीक्षक बागवे प्रकरणाचा करीत आहेत. दुसऱ्या घटनेत, सायबर चोरट्यांनी खडकी परिसरातील 43 वर्षीय तक्रारदाराला शेअर ट्रेडिंग कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले. त्यांची 11 लाख 80 हजारांची फसवणूक केली आहे. ही घटना 11 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2024 कालावधीत घडली. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुलपगारे करीत आहेत.
अतिरिक्त कमाईचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी महिलेला आठ लाख 15 हजारांचा ऑनलाइन गंडा घातला आहे. ही घटना 12 ते 17 मार्चदरम्यान खराडीत घडली असून, 53 वर्षीय महिलेने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अवंतिका, स्वाती शर्मा, रिसिका मेहेरा यांच्यासह अन्य मोबाईल नंबरधारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तपास करीत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List