डिजिटल अरेस्टची भीती घालून अमेरिकन नागरिकांची पुण्यातून लाखोंची लूट; आरोपी गुजरात, राजस्थानचे
‘डिजिटल अरेस्ट’ची भीती घालून अमेरिकेतील नागरिकांकडून दररोज तब्बल 30 ते 40 हजार डॉलर्स उकळणाऱया खराडीतील बनावट कॉल सेंटरचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला. ‘तुमच्या खात्यातून ड्रग्जचे व्यवहार झाले आहेत. तुम्हाला अटक केली जाऊ शकते, अशी भीती घालून दररोज एक लाख अमेरिकन नागरिकांचा डेटा वापरून ही फसवणूक केली जात होती. त्यातून आलेला पैसा इंटरनॅशनल हवालाच्या माध्यमातून देशात येत होता. याप्रकरणी गुन्हे शाखेने 5 जणांना अटक केली असून मुख्य सूत्रधारासह 3 जण फरार आहेत. अटक केलेले आरोपी हे गुजरात, राजस्थानमधील आहेत.
सरजितसिंग शेखावत ( सध्या रा. खराडी, मूळ रा. झुंझुनू, राजस्थान), अभिषेक पांडे (मूळ रा. अहमदाबाद, गुजरात), श्रीमय शहा (मूळ रा. अहमदाबाद), लक्ष्मण शेखावत (मूळ. रा. अहमदाबाद) आणि अॅरोन खिश्चन (मूळ रा. अहमदाबाद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, करण शेखावत (रा. अहमदाबाद), संजय मोरे आणि केतन रवाणी हे तिघे फरार आहेत, अशी माहिती सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. यातील करण शेखावत हा सूत्रधार असल्याचा पोलिसांना संशय आहे. तर, अटक केलेल्यांपैकी सरजितसिंग शेखावत हा मॅनेजर म्हणून काम करायचा. खराडी – मुंढवा रस्त्यावरील प्राईड आयकॉन या इमारतीच्या 9 व्या मजल्यावर मैग्नटेल बीपीएस अॅण्ड कन्सल्टंस या नावाने हे कॉल सेंटर सुरू होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, खराडी येथे कॉल सेंटर असून तेथून अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक होत असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. त्यानूसार शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांनी कॉल सेंटरवर छापा टाकला. त्यावेळी तेथे 123 लोक उपस्थित होते. त्यात 12 महिला होत्या. हे सर्वजण कर्मचारी म्हणून तेथे काम करीत होते. पहाटे सहा वाजेपर्यंत पोलिसांनी कॉल सेंटरची झडती घेतली. प्राथमिक चौकशीनंतर त्यांच्याकडून काम करून घेणाऱया पाच जणांना पोलिसांनी अटक केली. तर, तीन फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे उपायुक्त निखील पिंगळे, अर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
…असे चालायचे रॅकेट
या कॉल सेंटरमधील कर्मचारी अमेरिकन नागरिकांना फोन करून त्यांना बँक खात्यांशी संबंधित समस्या किंवा पोलिस तसेच तुमच्या खात्यातून ड्रग्सचे व्यवहार झाले असून तुम्हाला अटक होऊ शकते, अशी भिती घालून त्यांना ‘डिजीटल अरेस्ट’ करायचे. त्यानंतर यापासून बचावासाठी क्रिप्टो करन्सी किंवा अॅमेझॉन गिफ्ट व्हाउचर्सच्या स्वरूपात त्यांच्याकडून पैसे उकळले जात होते. हे पैसे इंटरनॅशनल हवालाच्या माध्यमातून देशात आणण्यात येत होते. त्यांची महिन्यात 7 ते 8 कोटींची उलाढाल होती, अशी प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, अटक आरोपी एकाच भागातील आहेत. त्यांची एकमेकांशी कशी ओळख झाली तसेच त्यांनी कर्मचाऱयांची नेमणूक कशी केली, याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
दहा हजार स्वेॊवअर फुट ऑफिस, 9 लाख भाडे
जून 2024 पासून खराडी येथे सुमारे 10 हजार स्क्वेअर फूटाच्या क्षेत्रफळात हे कॉल सेंटर सुरू होते. त्याला महिन्याला 9 लाख एवढे भाडे असल्याची माहिती आहे. येथून आरोपी सायबर गुन्हे करायचे. अमेरिकन नागरिकांना फोन करण्यासाठी नेमलेले कर्मचारी हे सर्व गुजरात, राजस्थान, दिल्ली या राज्यातील असून त्यांचे शिक्षण दहावी, बारावी पर्यंत झालेले आहे. पोलीस या प्रत्येकाची चौकशी करीत आहेत.
64 लॅपटॉप, 41 मोबाईल, 4 राऊटर
संबंधीत कॉल सेंटरमध्ये अमेरिकन वेळेनुसार सायंकाळी 6 ते रात्री 2 पर्यंत काम चालायचे. येथून पोलिसांनी 64 लॅपटॉप, 41 मोबाईल, 4 राऊटर जप्त केले आहेत. कर्मचाऱयांना रोज पह्न करण्यासाठी दिली जाणारी एक लाख जणांची यादी नेमकी कुठून आणि कशी येत होती, फसवणुकीनंतर मिळणारे पैसे देशात कसे येत होते, याबाबत गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत आहे.
कारवाईची भीती दाखवून अमेरिकन नागरिकांची सायबर फसवणूक करणाऱया कॉल सेंटरवर कारवाई करण्यात आली आहे. आरोपी अमेरिकेतील नागरिकांचा डेटा कसा मिळवित होते, यामध्ये आणखी कोण सहभागी आहे, याबाबत पुढील तपास करण्यात येत आहे. – रंजनकुमार शर्मा, सहपोलीस आयुक्त, पुणे शहर.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List