अनुबंध – तो एक क्षण

अनुबंध – तो एक क्षण

>> प्रा. विश्वास वसेकर

‘क्षण’ या दोन अक्षरी शब्दात आयुष्य सामावले आहे. काही क्षण नकारात्मक असतात तर काही सकारात्मक. काही शिकवणारे तर काही अनुभव देणारे. एखाद्या क्षणामध्ये अणुबॉम्बचे सामर्थ्य असते तर एखाद्यात भरपूर उर्जा! तुमच्या आयुष्यातला, अनुभवातला असा क्षण आठवा, त्यावर विचार करा, चिंतन करा आणि कविता लिहा, पण प्रत्येकाच्या कवितेचे शीर्षक एकच असेल, ‘तो एक क्षण…!’ प्राध्यापकांनी असे सांगितले आणि विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कविता लिहिल्या. प्राध्यापकाने प्रेरणा दिली आणि विद्यार्थ्यांकडून उत्तम कामगिरी करवून घेतली.

चाकरमान्या मराठीच्या प्राध्यापकाला कधी, कोणते काम करावे लागेल याचा काही नेमच नसतो. स्नेहसंमेलनाच्या काळात तर नाही नाही त्या स्पर्धांचे त्याला एक तर संयोजक व्हावे लागते, नाहीतर परीक्षक. परीक्षक होणे सोपे असते. ऐन वेळी यायचे, निकष आणि गुणांचा आयता तख्ता तुम्हाला दिला जातो, त्याआधारे मूल्यांकन करायचे! संयोजकाला मात्र खूप पूर्वतयारी असते. त्याला विषय ठरवायचा असतो, निकष आणि गुणविभागणीही.

एकदा मला सांगण्यात आले की, “उद्या होणाऱया काव्य लेखन स्पर्धेचे तुम्ही संयोजक! विद्यार्थ्यांना ऐन वेळी एक विषय द्या आणि त्या विषयावर तिथल्या तिथे एक कविता लिहायला सांगा.’’ आता आली का पंचाईत! कविता ही उत्स्फूर्तपणे सुचायची गोष्ट असते. एखादा विषय ठरवून ‘पाडायची’ गोष्ट नसते हे वर्षानुवर्षे कंठशोष करीत सांगणाऱया माझ्यावर कसला प्रसंग आला म्हणायचा! काहीही असो, पण सांगितलेले काम त्याबरहुकूम झालेच पाहिजे, नोकरी करायचीय ना तुम्हाला? पगार पाहिजे नं?

थोडा वेळ अस्वस्थ झालो, पण लागलीच तयारीला लागलो. आधी माझी स्वतची पूर्ण तयारी करून घेतली. दहा मिनिटांच्या प्रास्ताविकाचे मनातल्या मनात नियोजन करून हॉलवर गेलो. फळ्यावर विषय लिहिला, ‘तो एक क्षण’. त्याखाली विंदांच्या ‘त्रिवेणी’तील या ओळी लिहिल्या –

एका क्षणातील विराट सामर्थ्याने 

पूर्वरचित आयुष्य फुंकरीने उडवीत

एक दिवस

धिमी धिमी पावले टाकीत 

उंबरा ओलांडून आत आलीस 

आणि म्हणालीस,

‘मी आले’

विद्यार्थी कुतूहलाने वाचीत होते. मी करंदीकरांच्या पहिल्या ओळीकडे त्यांचे लक्ष वेधले. म्हणालो, एका क्षणातसुद्धा कसे विराट सामर्थ्य असू शकते पाहा. मी तुम्हाला काही क्षण सांगतो. महंमद गझनीने सतरा वेळा भारतावर स्वारी केली. एकदा पृथ्वीराज चौहानच्या तो हाती लागला तेव्हा महंमद गझनीने आपल्या प्राणासाठी त्याच्याकडे गयावया केली. तेव्हा उदार मनाने त्याने गझनीला जीवदान दिले. नंतरच्या वेळी मात्र उलटे झाले. पृथ्वीराज चौहानने गझनीला पूर्वीच्या प्रसंगाचे स्मरण दिले. गझनीने तरीही त्याला कठोरपणे ठार मारले. पृथ्वीराजाने गझनीला सोडून दिले तो क्षण निर्णायक ठरला आणि पुढे त्याच्याच जिवाचा घातक बनला. इतिहासात तुम्हाला असे अनेक ‘क्षण’ सापडतील. एका क्षणी झालेल्या चुकीचे परिणाम पुढे अनेक शतकांना भोगावे लागले आहेत.

तारीख की आँखोने ये दौर भी देखा है 

लम्हों ने खता की थी,

सदियों ने सजा पायी 

देवदास या शरदचंद्रांच्या कादंबरीत-चित्रपटात पारू ही त्याची बालमैत्रीण, प्रेयसी रात्री पळून त्याच्याकडे येते तो क्षण. त्या क्षणी निर्णय घ्यायला देवदास डगमगला आणि पार्वतीला त्याने परत पाठवले. या एका क्षणाच्या चुकीने देवदासचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. चित्रपटभर देवदासच्या तोंडी एक वाक्य येते, “उफ् इतनी सी गलती की इतनी बडी सजा!’’

सगळे क्षण नकारात्मकच असतात असे नाही. काही क्षण क्रांतिकारीही असतात. म. गांधींनी एक कृती केली आणि देशाला स्वातंत्र्य मिळाले. तो नेमका क्षण ग. दि. माडगूळकरांनी टिपला आहे –

उचललेस तू मीठ मूठभर 

साम्राज्याचा खचला पाया

अशा एका क्षणावर कविता लिहिणे फार अवघड असते. आव्हानात्मक असते. विद्यार्थी मित्रांनो, हे आव्हान तुम्हाला आज पेलायचे आहे. बी. रघुनाथ या महान कवीने हे आव्हान कसे पेलले आहे पाहा…

सय झाली ग 

सय झाली ग? सय झाली 

उलगडले सहजींच मनोदल 

रुमरुमली स्वप्नांतील चलबिल 

नीरव एकांतास लहडली 

सळसळ सुमगंधामधली 

सय झाली ग? सय झाली

खऱया कवीला असा क्षण खऱया अर्थाने जगता, भोगता आणि नेमक्या शब्दांत पकडता येत असतो. बशीर बद्र म्हणतात,

में इक लम्हे मे सदियाँ देखता हूं 

तुम्हारे साथ इक लम्हा बहुत है

तुम्ही गुलजारची गाणी ऐकली असतील. क्षण म्हणजे ‘लम्हा’ हा त्यांच्या कवितेचा केंद्रबिंदू असतो. त्यांच्या कवितेवरील लेखाला मी नाव दिलं होतं, ‘गुलजार ः क्षणाच्या अंतस्फोटाची कविता’. एखाद्या क्षणामध्ये अणुबॉम्बचे सामर्थ्य असते. तुमच्या आयुष्यातला, अनुभवातला असा क्षण आठवा, त्यावर विचार करा, चिंतन करा आणि कविता लिहा. प्रत्येकाच्या कवितेचे एकच शीर्षक असेल, ‘तो एक क्षण’.

माझ्या दहा मिनिटांच्या या निवेदनाने विचारात गढलेले विद्यार्थी, तीन परीक्षक प्राध्यापक आणि स्पर्धेसाठी माझ्या मदतीला आलेले प्राध्यापक एवढे उत्तेजित व प्रेरित झाले की, सर्वांनी एकापेक्षा एक सरस, उत्कृष्ट कविता लिहिली. त्या कविता म्हणूनही एवढय़ा छान होत्या की, महाविद्यालयाच्या वार्षिक अंकात तर आम्ही छापल्याच, पण अनेक वाङ्मयीन नियतकालिकांनी त्या स्वीकारल्या!

(लेखक ज्यंष्ठ साहित्यिक आहेत)

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ठाकरे बंधू एकत्र येणार, पडदा कधी उघडणार? संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले… ठाकरे बंधू एकत्र येणार, पडदा कधी उघडणार? संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुप्रीम कोर्टाकडून जाहीर झाल्या आहेत. त्या सरकारकडून जाहीर झालेल्या नाहीत. सरकारच्या मनात असते, तर अजून चार...
Bullet Train : एकदम सुपरफास्ट….या दिवशी बुलेट ट्रेन धावणार, तारीख जाहीर, मुंबईपर्यंत केव्हा पूर्ण होणार काम
‘हेरा फेरी 3’मधून बाहेर पडण्याबाबत अखेर परेश रावल यांनी सोडलं मौन; म्हणाले ‘माझं उत्तर..’
या चित्रपटात दीपिका पदुकोणची जागा आता तृप्ती डिमरी घेणार; नेमकं कारण काय?
पाणावलेल्या डोळ्यांनी राहुलने भाऊ मुकुल देवला दिला अंतिम निरोप; विंदु दारा सिंहलाही अश्रू अनावर
आठवडाभरापासून ICU मध्ये होते मुकुल देव, निधनाने कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; वहिनी म्हणाली..
गद्दारांसाठी घटनादुरुस्ती करून भाजप एकापेक्षा जास्त मुख्यमंत्री बनवेल; संजय राऊत यांचा टोला