आठवडाभरापासून ICU मध्ये होते मुकुल देव, निधनाने कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; वहिनी म्हणाली..
बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते मुकुल देव यांचं 23 मे रोजी निधन झालं. वयाच्या 54 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुकुल देव यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. मुकुल हे अभिनेते राहुल देव यांचे छोटे भाऊ होते. राहुलची पार्टनर मुग्धा गोडसेनं मुकुल यांच्या निधनावर भावना व्यक्त केल्या आहेत. संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसल्याचं तिने म्हटलंय.
‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मुग्धा म्हणाली, “मुकुल यांच्या जाण्याचा धक्का आम्ही अजूनही पचवू शकलो नाही. ते आठवडाभरापासून आयसीयूमध्ये होते. त्यांना आरोग्याशी संबंधित विविध समस्या होत्या. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. असं काही होईल याची कल्पनासुद्धा आम्ही कोणी केली नव्हती.” मुकुल यांच्या पार्थिवावर 24 मे रोजी दिल्लीतल्या निजामुद्दीनमधील दयानंद स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले.
मुकुल यांच्या निधनाने चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. रवी किशन आणि मनोज बाजपेयी यांनी मुकुल देव यांच्या निधनाबद्दल एक पोस्ट लिहित शोक व्यक्त केला आहे. तर दिग्दर्शक विक्रम भट्ट म्हणाले, “मुकुलबद्दल समजताच माझं हृदय वेगाने धडधडू लागलं. मी तो मेसेज पुन्हा पुन्हा वाचला. कारण त्यावर माझा विश्वासत बसत नव्हता. मला वाटलं की कोणीतरी अफवा पसरवतंय. पण जेव्हा मी मित्रांना फोन केले तेव्हा मला खात्री पटली की माझा मित्र मुकुल खरंच देवाघरी गेला आहे. मी सेटवर होतो. माझा साहाय्यक आला आणि त्याने शॉट तयार असल्याचं सांगितलं. पण मी तयार नव्हतो. त्याच्या सर्व आठवणी माझ्या मनात धावत होत्या.”
विक्रम भट्ट यांनी ‘दस्तक’ या चित्रपटासाठी मुकुल देव यांच्यासोबत काम केलं होतं. महेश भट्ट यांनी मुकुल यांना ती भूमिका देण्यास सांगितलं होतं. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान विक्रम भट्ट आणि मुकुल देव यांच्यात खूप चांगली मैत्री झाली. नऊ वर्षांपूर्वी विक्रम भट्ट यांच्या ‘क्रिएचर’ या चित्रपटात मुकुल देव यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्यानंतर काही काळापर्यंत ते अभिनय जगतापासून दूर होते. मुकुल देव यांनी ‘कोहराम’, ‘मुझे मेरी बीवी से बचाओ’, ‘यमला पगला दिवाना’, ‘सन ऑफ सरदार’, ‘आर राजकुमार’, ‘जय हो’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय. हिंदीसोबतच ते पंजाबी, बंगाली, तेलुगू, कन्नड चित्रपटांमध्येही झळकले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List