रोखठोक – छत्रपती शिवरायांचा प्रसाद; श्री सप्तकोटेश्वराकडे चला!

रोखठोक – छत्रपती शिवरायांचा प्रसाद; श्री सप्तकोटेश्वराकडे चला!

गोव्यातील नार्वे परिसरात 400 वर्षांपूर्वी छत्रपती शिवराय गेले तेव्हा  तेथे धड रस्तेही नव्हते. त्या डोंगरांच्या खाली सप्तकोटेश्वराचे मंदिर पोर्तुगीजांच्या धर्मसत्तेने उद्ध्वस्त केले होते. त्या मंदिराचा जीर्णोद्धार करून शिवरायांनी गोव्याच्या मोहिमेचा प्रारंभ केला. त्या श्री सप्तकोटेश्वराचे माहात्म्य हिंदवी स्वराज्यातही आहेच.

छत्रपती शिवाजीराजांनी देवळे उभारली नाहीत. त्यांनी अभेद्य किल्ले निर्माण केले. त्या किल्ल्यांमुळे महाराष्ट्रातील मंदिरांचे रक्षण झाले. शिवरायांनी इतर राजांसारखे महाल आणि राजवाडे उभे केले नाहीत. त्यामुळे इतर राजांसारखा शिवरायांचा राजवाडा कोणाला दिसणार नाही. शिवराय दऱ्याखोऱ्यांत, डोंगरकपारीत आणि अवघड किल्ल्यांवरच वावरले व राहिले. तरीही त्यांनी स्वत:चे हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्या स्वराज्यात मंदिरांना संरक्षण होते. सोरटी सोमनाथ मंदिरावर मोहम्मद गजनीने आक्रमण केले. त्याचा जीर्णोद्धार स्वातंत्र्यानंतर झाला. त्याची कहाणी आज वारंवार राजकीय कारणांसाठी सांगितली जाते, पण हिंदूंचे एकमेव छत्रपती शिवाजी महाराजांनी गोमंतक भूमीत पोर्तुगीजांनी पाडलेल्या सप्तकोटेश्वर मंदिराचा आपल्या हयातीत जीर्णोद्धार केला.

हा इतिहास अंधारात आहे. गोव्याला जो येतो तो या निसर्गरम्य भूमीच्या प्रेमात पडतो. महाराष्ट्रातून काही आमदार आसामच्या गुवाहाटीमध्ये गेले. ते हॉटेलच्या खिडकीतून डोंगर, झाडी, नदी पाहून प्रभावित झाले. हे आमदार आमच्या कोकणात व बाजूच्या महाराष्ट्रवादी गोव्यात कधी फिरकले नाहीत. गोव्याच्या वातावरणातील ताजेपणा, हिरवी झाडे, हिरवे डोंगर, नारळ-सुपारीच्या बागा, मांडवी-जुवारीसारख्या समुद्रसंपन्न नद्या, आरामशीरपणे जगणारी माणसे, गोव्यातली सुंदर मंदिरे, सुंदर हिरव्या वनराईतून देवळांचे वैभवशाली कळस आपल्याला प्रसन्न करतात. त्यातले एक महत्त्वाचे मंदिर श्री सप्तकोटेश्वराचे, जे छत्रपतींनी उभे केले, ते आजही उपेक्षित आहे. गोव्यात येणारा पर्यटक मंगेशीपासून शांतादुर्गेपर्यंत सर्व तीर्थाटने करतो, पण तो नार्वेतल्या सप्तकोटेश्वरापर्यंत पोहोचत नाही. चारशे वर्षांपूर्वी हिंदवी स्वराज्याचे राजे गोव्यात आले, ते पोर्तुगीजांशीही लढले व पोर्तुगीजांनी पाडलेले हे शिवमंदिर त्यांनी पुन्हा उभे केले. त्या मंदिराने राजांना आशीर्वाद दिले. गर्द झाडी व डोंगरांत उभ्या राहिलेल्या या मंदिराचे दर्शन विलोभनीय व सकारात्मक ऊर्जा देणारे आहे. दोन दिवस गोव्यात होतो व शिवरायांच्या स्पर्शाने पावन झालेल्या या मंदिरात गेलो तेव्हा त्या मंदिरात आजही प्रत्यक्ष शिवप्रभू व राजे संभाजी वावरत आहेत असा भास झाला. मुसळधार पावसात गोव्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. त्याच पावसात न्हाऊन निघालेले सप्तकोटेश्वराचे मोहक दर्शन घडले. शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पुनित झालेले नार्वे आणि शिवरायांच्या हातून जीर्णोद्धार झाला तो सप्तकोटेश्वर गोव्याच्या एका बाजूला व रानात आहे. चारशे वर्षांपूर्वी शिवरायांनी या मंदिराचे बांधकाम केले, पण या सर्व भागाचा म्हणावा तसा विकास झाला नाही. डिचोलीहून मये तलावाच्या बाजूने सप्तकोटेश्वराचे मंदिर तीन-चार मैलांवर पडते. दुसरा मार्ग पणजीहून. रायबंदरहून वाफोर म्हणजे फेरी लाँच पकडून जायचे. त्या मोटार लाँचमध्ये तुमची गाडीच जाते. एका वेळी जेमतेम चार गाडय़ा त्या वाफोरात जातात. पणजीहून 10-15 मिनिटांत तेथे पोहोचतो. हा प्रवास बहारदार आहे, पण शिवराय आले ते मचव्याने. तेव्हाचा प्रवास खडतर असावा. गोव्यात त्या काळी ख्रिश्चनांची प्रचंड धर्मसत्ता राज्य करीत होती. अल्फोंसो अल्बुकर्क एका हातात क्रूस आणि दुसऱ्या हातात तलवार घेऊनच गोव्यात उतरला. त्यामुळे त्याच्या तलवारीने सर्वप्रथम उद्ध्वस्त झाले ते हे सप्तकोटेश्वर शिवमंदिर. याच धर्मसत्तेचा बीमोड करण्यासाठी शिवछत्रपती सप्तकोटेश्वराच्या मंदिरात दाखल झाले होते. छत्रपती फक्त गोव्याच्या पर्यटनासाठी आले नव्हते. त्यांनी केवळ देवळाचा जीर्णोद्धार केला नाही. पोर्तुगीज राजसत्ता उलथवून टाकणे हे त्यांच्या गोवा मोहिमेचे ध्येय होते.

कदंबांचे स्थान

कदंबांची गोव्यावर सत्ता होती. कदंब राजाच्या मूळ पुरुषाची उत्पत्ती शंकराच्या कपाळावरील घामातून झाल्याचे मानण्यात येते. या महापरामी त्रिनेत्र जयंत राजाने सप्तकोटेश्वराचे पूजन केले. `श्री सप्तकोटेश्वरलब्धवर प्रसाद’ आणि `निजाराध्य श्री सप्तकोटेश्वर देव’ अशी वचने त्यांनी वापरलेली आढळतात. 1174 साली कदंबाच्या एका

राणीने देवगाव गाव ब्राह्मणांना दान दिले, त्याचे श्री सप्तकोटेश्वर देवाच्या पायाजवळ उदक सोडले, असे देवगावच्या शिलालेखात म्हटले आहे.  1210 मध्ये कदंबांनी सोन्याच्या नाण्यावर `श्री सप्तकोटेशलब्धवर वीर जयकेशि देव’ अशी नोंद केलेली आहे. कदंबांवर सप्तकोटेश्वर प्रसन्न होते. 1352 ते 1366 अशी 14 वर्षे गोवा बहामनी सत्तेखाली होते. यापैकी शेवटच्या आठ-दहा वर्षांत मंदिरांची मोडतोड मुसलमान सरदारांनी केली. सोमनाथाच्या शिवलिंगाप्रमाणे या शिवलिंगातही भरपूर संपत्ती लाभेल या अपेक्षेने हे भव्य शिवलिंग त्यांनी मुळासकट उखडून टाकले, पण त्यांना काहीच लाभ झाला नाही.

हिंदवी स्वराज्य किती?

हिंदवी स्वराज्याच्या विस्तारात सप्तकोटेश्वराचे महत्त्व मोलाचे आहे. शिवरायांचे स्वराज्य फक्त साडेतीन जिल्ह्य़ांचे, असे चेष्टेत सांगणारे आजही आहेत. हे स्वराज्य कोकणच्या सीमा पार करून गोव्यापर्यंत पोहोचले होते ते मोठय़ा संघर्षातून. हे साडेतीन जिल्हे गोव्याच्या पार होते. पोर्तुगीजांची परकीय सत्ता भारताच्या या निसर्गरम्य भूमीवरून नष्ट करण्याचा पहिला प्रयत्न शिवछत्रपतींनीच केला व सप्तकोटेश्वर हे त्याचे अधिष्ठान होते. फक्त सप्तकोटेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी शिवछत्रपती नार्वेला आले नव्हते, तर गोव्याच्या स्वातंत्र्याचे शिल्प  बांधण्यास, हिंदवी स्वराज्याचे घोडे पुढे नेण्यासाठी नार्वे येथे त्यांनी तळ ठोकला होता. आजही जेथे सर्वसामान्य गोमंतकीय कामाशिवाय जात नाही, अशा नार्वेसारख्या ठिकाणी रस्ते नसताना डोंगर, समुद्र ओलांडून शिवछत्रपती कसे आले असतील व त्यांनी तेथे कसा तळ ठोकला असेल? हा प्रश्न मला पडला.

गोव्यात माणसे पेरली

छत्रपती शिवाजी महाराज आपल्यावर चाल करून येतील व स्वराज्याचा विस्तार करतील, आपली धर्मसत्ता खिळखिळी करतील याचा अंदाज गोव्यातील पोर्तुगीज सत्ताधाऱ्यांना आला होता. पोर्तुगीज व्हाईसरॉय शिवरायांच्या हालचाली व मनसुबे याबाबतची सर्व माहिती लिस्बनला (पोर्तुगाल) पाठवीत असे. गिफर्ड आणि चेंबरलेन यांनी 26 डिसेंबर 1668 रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शिवाजीचे गोव्यावरील स्वारीचे बेत तडीस नेण्यासंबंधी कार्य सुरू आहे. त्याने त्याच्या माणसांचे वेगवेगळे गट आणि कामाची विभागणी केली आहे. वेगवेगळ्या कामांच्या निमित्ताने त्याने पोर्तुगीजांच्या गोव्यात पाच-सहाशे माणसे आधीच सोडून दिल्याची माहिती आहे. नार्वेतील सप्तकोटेश्वराचे मंदिर बांधण्यासाठी सामान हवे हे त्यापैकी एक महत्त्वाचे निमित्त असल्याचे इतिहासकार पांडुरंग पिसुर्लेकरांनी त्यांच्या ग्रंथात म्हटले आहे. शिवराय स्वत: वेंगुर्ल्यात बसून गोव्यावरील हल्ल्याची मांडणी करीत आहेत व सप्तकोटेश्वर मंदिराची उभारणी हे निमित्त असल्याचे पोर्तुगीजांचे ठाम मत झाले होते आणि संघर्षाची ठिणगी तेथे पडली. पोर्तुगीजांचा विरोध न जुमानता शिवरायांनी गोव्यात पाऊल ठेवलेच. गोवा मोहिमेची प्रतिष्ठापना करण्यासाठी त्यांनी आधी श्री सप्तकोटेश्वराची पुनर्स्थापना केली.

श्रावणी सोमवार

गोमंतक भूमीचे प्रेमी माधव गडकरी यांच्या बरोबर नार्वे, डिचोलीत जाण्याचा योग एकदा आला होता. श्री सप्तकोटेश्वराचे शिवरायांच्या मोहिमेतील महत्त्व त्यांनी तेव्हा विषद केले होते. ते आजही तसेच आहे. गडकरी यांनीसुद्धा या मंदिराचे माहात्म्य लिहून ठेवले आहे. नार्वेत प्रवेश केल्यावर बरेच पुढे मंदिर जवळ आले तरी कळस दिसत नाही. मंदिर खोल डोंगरदरीत आहे. तरीही ते भव्य आणि आकर्षक आहे. मंदिर बांधलेले नाही, तर डोंगराची कपार खोदूनच ते एकसंध शिलेचे बनवले आहे. पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केलेले शिवलिंग जेथे आहे, तो गाभारा प्राचीन लेण्याप्रमाणे खडकातून खोदलेला आहे. गाभाऱ्याची ही शिला व त्यावरचा कळसापर्यंतचा सर्व भाग हा एका शिलेचा आहे. प्रत्यक्ष डोंगर खोदूनच हे मंदिर उभे केलेले आहे. गाभाऱ्याच्या मागच्या शिलेस आता काचेचे संरक्षक कवच बसवले. ही शिला प्रत्यक्ष छत्रपतींच्या हातून पुढे गेली. त्यातून एक छोटा जिना मंदिराच्या वर गेलेला दिसतो. मंदिराच्या पुजाऱ्यांनी माहिती दिली, ”हा गुप्त दरवाजा नंतर संभाजीराजांनी तयार केला. त्या जिन्यावरून संभाजीराजे वर जात व मोहिमेच्या गुप्त बैठका घेत.” या सर्व शिवकालीन इतिहासाच्या खुणा मंदिरात आजही आहेत. शिवाजीराजांनी पेडणे ताब्यात घेतले व ते डिचोलीत आले. तो श्रावण महिना होता. सप्तकोटेश्वराचे माहात्म्य शिवरायांनी ऐकले होते. श्रावणातला सोमवार त्यांनी निवडला व पूजा करण्यासाठी नार्वेत आले. मंदिरात गर्भगृहासमोर चौक, छप्पर वगैरे काहीच नव्हते. पावसाळ्यासाठी लव्हाळ्याची शाकारणी केली होती. शिवछत्रपती पूजेस बसले व एक लव्हाळा खाली पडला. मंदिर बांधण्याचीच ही आज्ञा असल्याचे त्यांनी मानले. मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम शिवरायांनी सुरू केले. 13 नोव्हेंबर 1668 रोजी श्री सप्तकोटेश्वराचे मंदिर बांधण्यास प्रारंभ झाला. याचा संस्कृत शिलालेख आजही त्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर आहे. हा मूळ शिलालेख आहे. पोर्तुगीजांनी केलेल्या पाडापाडीत तो इतरत्र पडला होता. तो पुन्हा लावला.

श्री सप्तकोटीशके 1590 

किलकाब्द कार्तिक कृष्ण पंथ 

म्यांसोमेश्री शिवराज्ञा 

देवालयस्य प्रारंभ!

असा हा शिलालेख आजही झळकतो आहे. शिवरायांनी मंदिराचा चौक, घुमट बांधून घेतले. मंदिरासमोर दीपमाला आहे. देवस्थानच्या खर्चासाठी शिवरायांनी ग्रामसंस्थेकडून 700 होन मिळण्याची सनद करून दिली. त्याशिवाय जमीन दिली. अर्ध्यापेक्षा अधिक गोवा 1675 मध्ये छत्रपती शिवाजीराजांच्या अमलाखाली होता. श्री सप्तकोटेश्वराचा तो प्रसाद होता व शिवाजी महाराजांची या देवावर श्रद्धा होती. सप्तकोटेश्वराच्या इतिहासात हिंदवी स्वराज्य आणि गोव्याच्या स्वातंत्र्याचा इतिहास सामावलेला आहे. नार्वेच्या त्या रानात, डोंगराच्या कपारीत श्री सप्तकोटेश्वर उभा आहे. महाराष्ट्रातील प्रत्येकाने एकदा तरी या नार्वेच्या डोंगरावरून खाली पहायला हवे. त्या खोल दरीत छत्रपती शिवरायांनी उभा केलेला मंदिराचा कळस व गाभाऱ्यातला श्री सप्तकोटेश्वर तुम्हाला बोलवत आहे!

Twitter – @rautsanjay61

Gmail- [email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ठाकरे बंधू एकत्र येणार, पडदा कधी उघडणार? संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले… ठाकरे बंधू एकत्र येणार, पडदा कधी उघडणार? संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुप्रीम कोर्टाकडून जाहीर झाल्या आहेत. त्या सरकारकडून जाहीर झालेल्या नाहीत. सरकारच्या मनात असते, तर अजून चार...
Bullet Train : एकदम सुपरफास्ट….या दिवशी बुलेट ट्रेन धावणार, तारीख जाहीर, मुंबईपर्यंत केव्हा पूर्ण होणार काम
‘हेरा फेरी 3’मधून बाहेर पडण्याबाबत अखेर परेश रावल यांनी सोडलं मौन; म्हणाले ‘माझं उत्तर..’
या चित्रपटात दीपिका पदुकोणची जागा आता तृप्ती डिमरी घेणार; नेमकं कारण काय?
पाणावलेल्या डोळ्यांनी राहुलने भाऊ मुकुल देवला दिला अंतिम निरोप; विंदु दारा सिंहलाही अश्रू अनावर
आठवडाभरापासून ICU मध्ये होते मुकुल देव, निधनाने कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; वहिनी म्हणाली..
गद्दारांसाठी घटनादुरुस्ती करून भाजप एकापेक्षा जास्त मुख्यमंत्री बनवेल; संजय राऊत यांचा टोला