‘कोर्ट’ फेम वीरा साथीदारांच्या पत्नीविरोधात गुन्हा; पाकिस्तानी कविता वाचून प्रक्षोभक वक्तव्ये केल्याचा आरोप
‘कोर्ट’ चित्रपटातील दिवंगत अभिनेते वीरा साथीदार यांची पत्नी पुष्पा साथीदार यांच्यासह इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 13 मे रोजी नागपुरात झालेल्या एका कार्यक्रमात प्रक्षोभक वक्तव्य केल्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. वीरा साथीदार स्मृती समन्वय समिती आणि समता कला मंच या प्रमुख आंबेडकरी सांस्कृतिक संघटनेनं वीरा साथीदार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात एका सदस्याने पाकिस्तानी कवी फैज अहमद फैद यांची एक उर्दू कविता वाचून दाखवली होती. उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते दत्तात्रय शिर्के यांच्या तक्रारीनंतर पुष्पा आणि इतर दोघांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
समता कला मंचच्या एका महिला सदस्याने प्रसिद्ध पाकिस्तानी कवी फैज यांच्या ‘हम देखेंगे’ या कवितेतील ओळी वाचून दाखवल्या होत्या. त्यात ‘हम अहल-ए-सफा, मर्दूद-ए-हराम, मस्नाद पे बैठे जाएंगे, सब ताज उचले जाएंगे, सब तख्त गिराए जाएंगे..’ या ओळींचा समावेश होता. हुकूमशाहीविरोधात प्रतिकाराशी संबंधित या ओळी असून याचा अर्थ सरकारच्या विरोधात थेट चिथावणी असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. या कार्यक्रमादरम्यान एका पुरुष वक्त्याने प्रक्षोभक भाषण केल्याचंही तक्रारदार शिर्के म्हणाले. याचा व्हिडीओ नंतर एका मराठी वृत्तवाहिनीवरही दाखवण्यात आला. तक्रारीनुसार, संबंधित व्यक्तीने म्हटलं की, या गाण्याच्या माध्यमातून ज्याप्रकारे सत्तेला हादरा बसला होता, त्याचप्रमाणे आपल्या देशातसुद्धा सत्तेला हादरा देण्याची प्रथा आहे. आज आपण ज्या युगात आहोत, तो फॅसिझमचा युग आहे. हा हुकूमशाहीचा काळ आहे, असं भाषण देण्यात आलं होतं.
या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 152 (भारताच्या सार्वभौमत्वाला, एकतेला आणि अखंडतेला धोका निर्माण करणे), 196 (धर्माच्या आधारे वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे), 353 (दुष्कर्म घडवून आणणारी विधानं करणे) आणि 3 (5) अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. त्याचप्रमाणे कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोकांचे जबाब नोंदवण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी आतापर्यंत पाच जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
दिवंगत अभिनेते वीरा साथीदार यांनी ‘कोर्ट’ चित्रपटात उल्लेखनीय भूमिका साकारली होती. त्यांचं 13 मे 2021 रोजी निधन झालं होतं. त्यांनी कला, साहित्य, विद्रोही चळवळ आणि अभिनय अशा विविध क्षेत्रांमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली होती. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा कार्यक्रम वीरा साथीदार स्मृती समन्वय समितीने समता कला मंचच्या सहकार्याने आयोजित केला होता. नागपूरच्या विदर्भ हिंदी साहित्य संमोलनाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List