मृत्यूच्या दारातून परत आलो…; दिल्ली-श्रीनगर विमानात असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितला थरारक अनुभव
दिल्लीहून श्रीनगरकडे जाणाऱ्या विमानावर बुधवारी रात्री वीज कोसळली. यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली होती. ही घटना घडताच श्रीनगर विमानतळावर इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आले. त्यामुळे 227 प्रवाशांचा जीव वाचला. दरम्यान या विमानात तृणमूल काँग्रेसच्या नेत्या सागरिका घोष या देखिल उपस्थित होत्या. त्यामुळे त्यांनी तेथील अनुभव सांगितला आहे.
दिल्लीहून श्रीनगरकडे जाणाऱ्या विमानात तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओ’ब्रायन, नदीमुल हक, सागरिका घोष, मानस भुनिया आणि ममता ठाकूर असे पाच सदस्यीय शिष्टमंडळ उपस्थित होते. बुधवारी रात्री अत्यंत ढगाळ वातावरण असून विजांच्या गडगडाटांसह पाऊस सुरु होता. यावेळी श्रीनगरकडे जाणाऱ्या विमानावर वीज कोसळली आणि विमानात एकच गोंधळ उडाला. यावेळी विमानात तृणमूल काँग्रेसचे नेते उपस्थित असल्यामुळे त्यांनी थरारक अनुभव सांगितला. वीजेमुळे विमान हादरले तेव्हा आम्ही जवळपास मृत्यूलाच कवटाळले असे वाटले होते, असं सागरिका घोष म्हणाल्या.
इंडिगोचे विमान दिल्लीवरून श्रीनगरला जात असताना झालेल्या गारपिटीमुळे विमानाला अचानक हादरे बसले. त्यामुळे निर्माण झालेल्या टर्ब्युलन्समुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. pic.twitter.com/yqzqiwCcDG
— Saamana Online (@SaamanaOnline) May 21, 2025
जेव्हा विमानावर वीज कोसळली, तेव्हा सगळेच खूप घाबरले होते. तो जवळजवळ मृत्यूसारखा अनुभव होता. मला वाटलं माझं आयुष्य संपलं आहे. विमानातील प्रवासी ओरडत होते, प्रार्थना करत होते आणि घाबरले होते. पण पायलटने प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी अनेक प्रयत्न केले. आम्हाला त्यातून बाहेर काढणाऱ्या पायलटला सलाम. आम्ही उतरलो तेव्हा आम्ही विमान पाहिले. तेव्हा विमानाचा पुढचा भाग उडून गेला होता असे दिसले,” असे तृणमूल काँग्रेसच्या नेत्या सागरिका घोष म्हणाल्या. तसेच लँडिंगनंतर संपूर्ण शिष्टमंडळाने पायलटचे आभारही मानले.
विमान हलत असताना घाबरलेले प्रवासी त्यांच्या जीवासाठी प्रार्थना करत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List