नाशिकच्या भाताचा गुजरातमध्ये काळाबाजार, पुरवठा खात्याचा घोटाळा उघड; राईस मिल मालकावर गुन्हा
आदिवासी विकास महामंडळाच्या गोदामातील भाताचा (साळ) गुजरातमध्ये काळाबाजार केल्याचे चौकशीत सिद्ध झाले आहे. याप्रकरणी राईस मिल संचालक व वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्याची शिफारस महामंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यामुळे दै. ‘सामना’च्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे.
केंद्र सरकारच्या आधारभूत खरेदी योजनेतून आदिवासी विकास महामंडळाने नाशिक जिल्ह्यातून तेवीसशे रुपये प्रतीक्विंटल दराने 1 लाख 65 हजार 540 क्विंटल भात (साळ) खरेदी केला. त्याबदल्यात सुमारे 38 कोटींहून अधिक रक्कम आदिवासी शेतकऱ्यांना अदा केली. महामंडळाच्या गोदामातील या भाताची भरडाई करून त्याच्या 67 टक्के तांदूळ पुरवठा विभागात जमा करण्याचा ठेका राईस मिलला दिला जातो. यासाठी तीन राईस मिल नेमण्यात आल्या होत्या, त्यापैकी पांढुर्ली येथील रेणुका राईस मिलकडे सत्तर टक्क्याहून अधिकचे काम होते.
सुरगाणा येथील महामंडळाच्या गोदामात सर्वाधिक भाताची साठवण आहे. तेथील भात नाशिकजवळील पांढुर्लीच्या राईस मिलमध्ये न नेता तो थेट गुजरातमध्ये नेला, तेथे त्याचा काळाबाजार केल्याचे वृत्त ‘सामना’ने 3 मे रोजी प्रसिद्ध केले, त्यानंतरच्या वृत्तातून पाठपुरावा करण्यात आला. आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका लीना बनसोड यांनी याप्रकरणी चार सदस्यीय चौकशी समिती नेमली होती. पंधरा दिवस चौकशी करण्यात आली. भाताचे ट्रक हे गुजरातमध्ये गेले, तेथे काळाबाजार झाला, हे सिद्ध झाले. याप्रकरणी रेणुका राईस मिलचा मालक राहुल भागवत आणि ट्रकचालक या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची शिफारस चौकशी समितीच्या अहवालानंतर महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका लीना बनसोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
पुरवठा खाते संशयाच्या भोवऱ्यात
भात भरडाईनंतर 67 टक्के तांदूळ हा पुरवठा खात्याच्या गोदामात जमा केला जातो. 1 मे रोजी सुरगाण्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी गुजरातमध्ये जाणाऱ्या ट्रकचा पाठलाग केला. 3 मे रोजी प्रकरण चव्हाटय़ावर आले. हा ट्रक गोदामातून 28 एप्रिलला निघाला असताना त्याच दिवशी तो नाशिकजवळील पांढुर्ली येथील मिलमध्ये गेलाच नाही, तो दोन-तीन दिवस सुरगाण्यातच थांबून होता. बोहाडा कार्यक्रमाची गर्दी कमी झाल्यानंतर तो गुजरातमध्ये नेण्यात आला. त्यापूर्वीच्या भाताचा तांदूळ पुरवठा खात्याच्या गोदामात जमा केल्याच्या पावत्या सुरगाण्यातील महामंडळाच्या गोदामात दाखविण्यात आल्या होत्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List