अकरावी प्रवेशाचे बारा वाजले; संकेतस्थळ कोलमडले, सर्व्हर बोंबलला
संपूर्ण राज्यातील 20 लाखांहून अधिक अकरावी जागांवरील ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे पहिल्याच दिवशी बारा वाजले. सर्व्हर बोंबलल्याने प्रवेशाचे संकेतस्थळ सकाळपासूनच कोलमडलेले होते. दिवसभर संकेतस्थळ बंद राहिल्याने एकाही विद्यार्थ्याला नोंदणी करता आली नाही. आता 22 मे रोजी अकरावीचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.
विद्यार्थ्यांना 21 मे पासून अकरावीकरिता नोंदणी आणि पसंतीच्या कॉलेजाकरिता क्रम नोंदवायचे होते. आतापर्यंत अकरावीचे प्रवेश विभागीय स्तरावर होत होते. परंतु, यंदा राज्यातील तब्बल 20 लाख 43 हजार जागांकरिता पेंद्रीभूत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (पॅप) राबविली जात आहे. मात्र, सकाळीच वेबसाईट क्रॅश झाली.
शालेय शिक्षण विभागाच्या नावाने बोटे मोडत लाखो विद्यार्थी, पालक कामधंदे सोडून दिवसभर वेबसाईट रिफ्रेश करत होते, परंतु रात्री उशिरापर्यंत संकेतस्थळ बंदच राहिल्याने राज्यातील लाखों विद्यार्थी-पालकांचा जीव टांगणीला लागला. नेटवर्क, तांत्रिक सुविधा, गॅझेट यांचा अभाव असलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या हालांना तर पारावार नव्हता. इतक्या मोठय़ा स्तरावर अकरावी प्रवेशाचे केंद्रीकरण करण्यात आले. मात्र त्यासाठी शालेय शिक्षण विभागाची यंत्रणा बिलकुलच तयार नसल्याचे दिसून आले.
अभूतपूर्व गोंधळानंतर अखेर प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यक वेळ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशाचे वेबपोर्टल मोबाईलद्वारे हाताळताना अधिक सुलभ व्हावे यासाठी काही वेळासाठी पोर्टलची सुविधा बंद ठेवण्यात आली आहे, असा खुलासा विभागाकडून करण्यात आला. तसेच, प्रवेश प्रक्रियेचे अपडेट देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या व्हॉट्स अप चॅनेलवर माहितीकरिता संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. माहितीसाठी व्हॉट्स अप चॅनेल https://whatsapp.com/channel/0029VbB2T6DBA1etTOdyi10C
– केवळ राज्य शिक्षण मंडळाचीच नव्हे, तर सीबीएसई, आयसीएसई, आयजीसीएसईसारख्या अन्य शिक्षण मंडळाचे विद्यार्थीही अकरावी प्रवेशाकरिता शालेय शिक्षण विभागाच्या प्रवेश प्रक्रियेवर अवलंबून आहेत.
– एकही प्रवेश विना ऑनलाईन नोंदणीशिवाय होणार नसल्याने लाखो विद्यार्थ्यांची मदार या वेबसाईटवर आहे.
आज सुधारित वेळापत्रक
प्रवेशाचे वेळापत्रक कोलमडणार असल्याचे लक्षात आल्याने 22 मे रोजी पहिल्या फेरीचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्याचा निर्णय शिक्षण संचालनालयाने सायंकाळी जाहीर केला. पहिल्या फेरीसाठी विद्यार्थी नोंदणी आणि पसंतीक्रम भरण्याकरिता पुरेसा वेळ दिला जाईल. तसेच प्रवेशाचे पोर्टल सुलभ आणि त्रुटीरहित करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. पोर्टल कधी सुरू करणार याची माहिती ऑनलाईन दिली जाईल. तसेच मोबाईल आणि ईमेलद्वारेही कळविले जाणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List