ती डोळ्यांत पाणी आणून फक्त माफी मागत होती..; राज बब्बर यांनी सांगितली स्मिता पाटील यांच्या अखेरच्या क्षणांची आठवण
अभिनेते राज बब्बर आणि स्मिता पाटील हे ‘भिगी पलकें’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यावेळी राज हे नादिरासोबत विवाहित होते, तरीसुद्धा ते स्मिता यांच्याकडे आकर्षित झाले होते. या दोघांनी लग्न केलं, परंतु बाळाच्या जन्मानंतर लगेचच स्मिता यांचं निधन झालं. 1986 मध्ये बाळंपणातील गुंतागुंतीमुळे त्यांची तब्येत खालावली आणि मुलगा प्रतीकला जन्म दिल्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्मिता यांच्यासोबत घालवलेले अखेरचे काही क्षण राज यांच्यासाठी खूप कठीण आणि भावनिक होते. ‘रेडिफ’ला दिलेल्या मुलाखतीत राज यांनी त्या प्रसंगाच्या आठवणी सांगितल्या होत्या. अखेरच्या क्षणी स्मिता पाटील सतत माफी मागत होत्या, असं त्यांनी सांगितलं.
“घरापासून हॉस्पिटलपर्यंत पोहोचेपर्यंत ती माफी मागत होती. मी तिला समजावण्याचा प्रयत्न करत होतो की सगळं ठीक होईल. तिने माझ्याकडे पाहिलं तेव्हा तिच्या डोळ्यांत पाणी होतं. तिच्या त्या नजरेनं मला सर्वकाही सांगितलं होतं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर तासाभराने डॉक्टर माझ्याकडे आणि म्हणाले की स्मिता कोमात गेली आहे. मी तिच्या आयुष्याचा एक भाग होतो आणि ती माझ्या आयुष्याचा भाग होती. तुम्ही स्वत:ला कितीही कणखर म्हटलात तरी ज्या व्यक्तीने आयुष्यभरासाठी तुमचं हृदय आणि आत्मा व्यापून टाकलं होतं, त्या व्यक्तीची खूप आठवण येणं स्वाभाविक आहे. माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत ती आणि तिच्या आठवणी कायम माझ्या आयुष्याचा एक भाग राहतील,” अशा शब्दांत राज बब्बर यांनी भावना व्यक्त केल्या होत्या.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या एका मुलाखतीत राज यांनी स्पष्ट केलं होतं की, नादिरासोबत वैवाहिक आयुष्यातील समस्यांमुळे मी स्मिताशी नातं जोडलं नव्हतं. ते सर्व सहजपणे घडलं होतं, असं ते म्हणाले. तर एका मुलाखतीत स्मिता म्हणाल्या होत्या, “सध्या आम्ही दोघं अशा परिस्थितीत आहोत, जिथे दोघं एका नरकातून जातोय. सर्वकाही ठीक होईल असं म्हणणं खूप सोपं आहे. पण खऱ्या आयुष्यात हे सर्वकाही सोपं नाही.”
राज बब्बर आणि त्यांची पहिली पत्नी नादिरा यांचा मुलगा आर्य बब्बरने वडिलांच्या या नात्याबद्दल एका व्हिडीओत त्याचं मोकळं मत मांडलं होतं. “प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास त्यांचं ते अफेअर नव्हतं. बाबा आणि स्मिता पाटील यांचं ते खरं प्रेम होतं. एक कुटुंब म्हणून आम्ही त्यांच्या नात्याला समजण्याचा प्रयत्न केला आणि ते स्वीकारलं. आम्ही त्या दोघांच्या नात्याचा आदर केला. पण जेव्हा तुम्ही सहा-सात वर्षांचे असता, तेव्हा तुम्हाला यातलं काहीच समजत नसतं. याच कारणामुळे वडिलांसोबतचं माझं नातं बिघडलं होतं. कारण मला त्यांच्याबद्दलच्या गोष्टी नीट कळतच नव्हत्या. आता वयाच्या 43 व्या वर्षी, 8 ते 9 वर्षांचा संसार केल्यानंतर मला ही गोष्ट समजतेय की, बाप इतना भी गलत नहीं था (वडील इतके पण चुकीचे नव्हते)”, असं तो म्हणाला होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List