अखेर रोहित शर्मा कसोटीतून निवृत्त; इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाला लाभणार नवा कर्णधार
ऑस्ट्रेलियातील दारुण पराभवानंतरच कर्णधार रोहित शर्माला पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या नेतृत्वाचा आणि आपल्या कसोटी कारकीर्दीचा राजीनामा देणे गरजेचे होते. मात्र कर्णधार आणि फलंदाज अशा दुहेरी अपयशानंतरही रोहितने कसोटीतून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला नव्हता. मात्र इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी रोहितला कर्णधारपदावरून काढण्याची सूत्रांची माहिती समोर येताच रोहितने सायंकाळी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे रोहितच्या कसोटी क्रिकेट निवृत्तीबाबत कुणालाही आश्चर्याचा धक्का बसला नाही. हे तर होणारच होते, अशी प्रतिक्रिया क्रिकेट जगतातून उमटली.
आज सकाळपासूनच रोहितला नेतृत्वपदापासून दूर केल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती समोर आली होती आणि ही माहिती रोहितलाही कळवल्याचे समजले होते. त्यामुळे कर्णधारपद गेले तरी फलंदाज म्हणून तो संघात खेळणार की नाही हे स्पष्ट नव्हते. मात्र सायंकाळी समाजमाध्यमांवर त्याने आपल्या कसोटी क्रिकेट निवृत्तीची माहिती दिली. रोहितने आधीच टी-20 तून निवृत्ती जाहीर केली होती आणि आता कसोटीतून, मात्र तो एकदिवसीय क्रिकेट खेळत राहणार असल्याचे कळले आहे.
गेल्या वर्षी कसोटीत दुहेरी अपयश
हिंदुस्थानला टी-20 क्रिकेटचे जगज्जेतेपद मिळवून दिल्यानंतर रोहितने आणखी काही वर्षे कसोटी क्रिकेट खेळणार असल्याचे म्हटले होते. मात्र टी-20 वर्ल्ड कपनंतर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेने रोहितच्या स्वप्नांचा चुराडा करायला सुरुवात केली. या मालिकेसाठी न्यूझीलंडचा नवखा संघ हिंदुस्थानविरुद्ध 3-0 ने हरण्यासाठी आला होता. पण याच नवख्या संघाने हिंदुस्थानी संघाला त्याच्या घरात घुसून 3-0 ने धूळ चारली आणि अवघ्या जगाला आश्चर्याचा धक्का दिला. हा पराभव हिंदुस्थानी संघाचा गेल्या दोन दशकांतील सर्वात लाजीरवाणा पराभव होता. यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वाकांक्षी दौऱयावरही रोहितने घोर निराशा केली. या दौऱयात रोहित 3 कसोटी खेळला होता. त्यापैकी एक कसोटी अनिर्णित राहिली आणि उर्वरित दोन्ही कसोटींत हिंदुस्थानला हार सहन करावी लागली. ही मालिकाही हिंदुस्थानने 3-1 ने गमावली होती. या मानहानीकारक अपयशानंतरच रोहितवर जोरदार टीका करण्यात आली होती.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपासून वाईट काळ सुरू
गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्धची मालिका 4-1 ने जिंकत रोहितने जोरदार सुरुवात केली होती. या मालिकेत रोहितने दुहेरी धमाका करताना फलंदाजीतही कमाल दाखवली होती. या मालिकेत त्याने दोन शतकांसह 400 धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतरच्या मालिकांमध्ये रोहितने फलंदाज म्हणून अत्यंत सुमार कामगिरी केली. त्यानंतर खेळल्या गेलेल्या 8 कसोटींतील 15 डावांत 6, 5, 23, 8, 2, 52, 0, 8, 18, 11, 3, 6, 10, 3, 9 असा निराशाजक खेळ करत केवळ 156 धावा केल्या. याच अपयशी कामगिरीमुळे रोहितचे संघातील स्थान डळमळीत झाले होते.
कसोटी कारकीर्द सामान्यच
कर्णधार म्हणून रोहित यशस्वी ठरला असला तरी त्याची कसोटी कारकीर्द फार बहरू शकली नाही. तो 67 कसोटी सामने खेळला असून त्याने 40.57 सरासरीने 12 शतकांसह 4301 धावा केल्या आहेत. इडन गार्डन्सवर वेस्ट इंडीजविरुद्ध पदार्पण करताना त्याने 177 धावांची खेळी केली होती. तसेच दुसऱया कसोटीतही त्याने नाबाद 111 धावा केल्या होत्या. रोहितने आपल्या कारकीर्दीत एकमेव द्विशतकही झळकावले आहे. 212 हीच त्याची सर्वोच्च खेळी ठरली आहे.
वनडे खेळतच राहणार
गेल्यावर्षी टी-20 आणि आता कसोटीला रामराम ठोकणारा रोहित शर्मा पुढेही एकदिवसीय सामन्यात आपली फटकेबाजी दाखवत राहणार आहे. हिंदुस्थानी संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देणारा रोहित आता वनडे कर्णधारपदी कायम राहतो की नेतृत्व सोडून तो केवळ फलंदाजीचा मनसोक्त आनंद लुटणार, हे लवकरच स्पष्ट होईल.
तडकाफडकी निर्णय का?
रोहितने ऑस्ट्रेलिया दौऱयानंतर निवृत्ती जाहीर करणे गरजेचे असतानाही त्याने ती केली नाही. तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदानंतरही आपण कसोटी खेळणार असल्याचे संकेत त्याने दिले होते. आगामी इंग्लंड दौऱ्यातही त्याला टीम इंडियाचे नेतृत्व करायचे होते. पण गेल्या दोन दिवसांत झालेल्या घडामोडींत अपेक्षेप्रमाणे रोहितचे नेतृत्व काढले जाणार असले तरी त्याला कसोटी संघात स्थान दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. असे असतानाही रोहितने बुधवारी तडकाफडकी निवृत्ती घेतली. त्याचा हा निर्णय अनेकांना खटकला आहे. बीसीसीआयने या प्रकरणात रोहितची नेतृत्वाची मागणी फेटाळल्यामुळे त्याने निवृत्ती जाहीर केली असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
यशस्वी ते अपयशी कर्णधार
विराट कोहलीने 2022 च्या प्रारंभी नेतृत्व सोडल्यानंतर संघाची जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवण्यात आली. त्यानंतर पहिल्या 18 पैकी 12 कसोटींत तो यशस्वी ठरला तर केवळ चार कसोटींत त्याला हार सहन करावी लागली होती. मात्र त्यानंतर झालेल्या दोन कसोटी मालिकेत त्याने सहा कसोटींत संघाचे नेतृत्व केले आणि त्याला एकाही कसोटीत संघाला यश मिळवून देता आले नाही. त्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडविरुद्ध 0-3 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 0-2 अशी हार टीम इंडियाला पत्करावी लागली.
तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक ठोकणारा एकमेव हिंदुस्थानी कर्णधार
रोहित शर्माने कर्णधार म्हणून कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 अशा तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके ठोकण्याचा पराक्रम केला आहे. तो ही कामगिरी करणारा एकमेव हिंदुस्थानी कर्णधार असून क्रिकेट विश्वात तिलकरत्ने दिलशान, फाफ डय़ुप्लेसिस आणि बाबर आझम यांनाच हा विक्रम करता आलेला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List