एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये फक्त त्याची चूक नाही, मुलीसुद्धा..; आदित्य पांचोलीबद्दल काय म्हणाली पत्नी?
अभिनेत्री झरीना वहाबला प्रेक्षकांनी चित्रपटांमध्ये अनेक सहाय्यक भूमिकांमध्ये पाहिलं असेल. सत्तरच्या दशकात तिने अनेक चित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या. परंतु आपल्या प्रोफेशनल लाइफपेक्षा झरीना तिच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिली. झरीनाने तिच्यापेक्षा वयाने पाच वर्षांनी लहान आदित्य पांचोलीशी लग्न केलं होतं. लग्नानंतरही आदित्यच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सच्या चर्चा सुरूच होत्या. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत झरीना याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. मी माझ्या पतीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे दु:खी नाही, असं तिने म्हटलंय. इतकंच नव्हे तर पतीच्या अशा अफेअर्ससाठी तिने त्या मुलींना जबाबदार ठरवलंय, जे आदित्यसोबत तो विवाहित असल्याचं माहीत असूनही रिलेशनशिपमध्ये असायचे.
या मुलाखतीत झरीना म्हणाली, “आम्ही एकमेकांना भेटल्यानंतर 15-20 दिवसांतच लग्न केलं होतं. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आमची भेट झाली होती. तो खूपच हँडसम दिसायचा. एके दिवशी त्याला रडायचा सीन शूट करायचा होता. शूटिंगदरम्यान तो रडायचं थांबतच नव्हता. अखेर मी त्याला एका कारमध्ये बसवलं आणि त्याचा हात हातात घेऊन त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्या क्षणानंतर आमच्यानंतर जवळीक निर्माण झाली आणि त्याच्या 15 दिवसांतच आम्ही लग्न केलं होतं. त्यावेळी प्रत्येकजण हेच म्हणायचा की मी इतक्या चांगल्या दिसणाऱ्या मुलाशी लग्न केलंय, तो मला आठवडाभरातच सोडून जाईल. पण आता पहा आमच्या लग्नाला 38 वर्षे झाली आहेत.”
आदित्य पांचोलीचं अभिनेत्री कंगना राणौतशी अफेअरच्या खूप चर्चा होत्या. पतीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबद्दल झरीना पुढे म्हणाली, “लोकांना असं वाटतं की मी खूप तणावात आहे. आदित्य या किंवा त्या मुलीला डेट करतोय हे पाहून मी खूप दु:खी असेन, असं त्यांना वाटतं. पण कोणी असं म्हणत नाही की, ती मुलगी आदित्यला डेट करतेय.” विवाहबाह्य संबंधासाठी फक्त विवाहित पुरुषाला चुकीचं ठरवणं योग्य नसल्याचं मत तिने यावेळी मांडलं. इतकंच नव्हे तर आदित्य कोणत्याही दुसऱ्या महिलेसाठी कधीच इतका गंभीर होणार नाही, असंही ती म्हणाली. “हे चुकीचं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात एक टप्पा येतो आणि निघून जातो. मी अशा टप्प्यांना कधीच गांभीर्याने घेत नाही. कारण मला माहीत आहे की तो कोणासोबतच गंभीर होणार नाही. कारण तो माझ्यावर खूप प्रेम करतो”, असा विश्वास झरीनाने व्यक्त केला.
पतीच्या अफेअर्सबद्दल ऐकून वाईट वाटतं का, असा प्रश्न या मुलाखतीत झरीनाला विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना ती म्हणाली, “जेव्हा मी अफेअरच्या बातम्या वाचते, तेव्हा मला वाईट वाटतं. पण नंतर त्यावर मीच हसते. तो बाहेर काय करतो याची मला पर्वा नाही. परंतु जेव्हा तो घरी येतो तेव्हा तो एक उत्तम पिता आणि पती असतो. माझ्यासाठी हेच महत्त्वाचं आहे. जर तो त्याचे अफेअर्स घरी घेऊन आला असता, तर मला वाईट वाटलं असतं. अनेक पुरुषांचे अफेअर्स असतात आणि तरीदेखील ते कुटुंब चालवतात. जर या गोष्टींवरून मी भांडायला सुरुवात केले तर मलाच त्रास होईल. मला हा त्रास नकोय, मी स्वत:वर प्रेम करते. त्याचसोबत मी आदित्यसोबत फक्त प्रेमाखातर आहे, मी त्याच्यावर अवलंबून नाही. मला एकटं राहावं लागलं तरी माझ्याकडे बरीच संपत्ती आहे. पण त्याला सोडण्याचा मी कधीच विचार केला नाही.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List