‘हा तर बालिशपणा प्रसिद्धीसाठी…’, अमित ठाकरेंच्या पत्रावर गिरीश महाजनांचा खोचक टोला
मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे. युद्धाचा निकाल अद्याप स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा, थोडा संयम बाळगावा, युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजय रॅली ज्या निघत आहेत त्या टाळाव्या अशी विनंती अमित ठाकरे यांनी या पत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. तसेच राष्ट्रीय सुरक्षेचे निर्णय घेतले त्याबद्दल त्यांनी मोदींचे आभार देखील मानले आहेत. अमित ठाकरे यांच्या या पत्रावर प्रतिक्रिया देताना आता भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले गिरीश महाजन?
अमित ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहिलेलं पत्र प्रसिद्धीसाठीचे पत्र असून हा बालिशपणा आहे. संपूर्ण देशाने आणि जगाने बघितले आपण काय केलं म्हणून? तुम्हाला त्याबाबतही काही शंका आहे का? असा सवाल यावेळी गिरीश महाजन यांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, संपूर्ण जगाने पाहिले, आमच्या सैन्याने काय केलं आणि तुम्हाला आता काय त्याचा रिझल्ट पाहिजे, संपूर्ण बालिशपणा चालला आहे हा, प्रसिद्धीसाठी असे पत्र लोक का लिहितात? मला काही कळत नाही, असं पत्र लिहिण्याची काहीच आवश्यकता नाहीये, असा टोला यावेळी महाजन यांनी अमित ठाकरे यांना लगावला आहे.
शिवराज दिवटे मारहाण प्रकरणावर प्रतिक्रिया
बीडमध्ये एका टोळक्याकडून शिवराज दिवटे नावाच्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती, यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. यावर देखील महाजन यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली आहे. मी सुद्धा ही बातमी बघितली खूप अमानुषपणे त्या तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणात कारवाई सुरू आहे, अधिक कठोर कारवाई होईल. समाजामध्ये मानसिक विकृतीच एवढी वाढली आहे? तर त्याला आता कोण काय करणार. मात्र यापुढे अशा स्वरुपाचे गुन्हे होणार नाहीत, याबाबत पोलीस कारवाई करतील असं महाजन यांनी म्हटलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List