सिद्धेश्वर तलावात पुन्हा मृत माशांचा खच; ठाण्याच्या प्रदूषण विभागाने घेतला बळी
तलावांचे शहर असा लौकिक असलेल्या ठाणे शहरातील सिद्धेश्वर तलाव मृत झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या तलावात आज पुन्हा शेकडो माशांचा मृत्यू झाला आहे. तलावांच्या प्रदूषणाबाबत वारंवार तक्रारी करूनदेखील पालिका प्रशासन झोपले आहे. दरम्यान प्रदूषण विभागाने निष्पाप माशांचा बळी घेतल्याचा आरोप करीत स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.
ठाणे महापालिका मुख्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या सिद्धेश्वर तलावात जलपर्णीबरोबर मोठ्या प्रमाणावर प्रदूषण झाले आहे. या तलावाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर नागरिक राहत असून तलावाची निगा राखण्याचे काम एका कंत्राटदाराला देण्यात आले आहे. परंतु कंत्राटदारावर अधिकाऱ्यांकडून वचक नसल्याने तलावाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे २४ एप्रिल रोजी माशांचा मृत्यू झाला. पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे स्थानिकांनी तक्रार केल्यानंतर उपाययोजना करण्याचे आदेश दिले. परंतु त्यानंतरही तलावातील परिस्थिती बदलली नाही. त्यामुळे १० मे रोजी पुन्हा माशांचा मृत्यू झाला होता. तर आज पुन्हा या तलावातील शेकडो मासे मृत झाले असल्याचे आढळले आले.
मृत्यूच्या कारणाचा शोध लागलेला नाही
तलावातील ऑक्सिजन संपला असल्याचे कारण प्रदूषण विभागाकडून सांगण्यात येत आहे. तीन वेळा माशांच्या मृत्यूची घटना घडूनही, मृत्यूच्या कारणाचा शोध लागलेला नाही. या तलावाची स्थिती सुधारण्यात पालिका अपयशी ठरल्यामुळे सिद्धेश्वर तलाव हा मृत झाला, असे समजायचे का, असा सवाल स्थानिक लोकप्रतिनिधींनी केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List