भाजपने लोकशाहीतील पक्षपद्धतीचा अपमान केलाय; सर्वपक्षीय शिष्टमंडळावरून जयराम रमेश यांची टीका
दहशतवादाविरुद्धची हिंदुस्थानची लढाई आणि ऑपरेशन सिंदूरबाबत जगाला माहिती देण्यासाठी सरकारकडून सर्वपक्षीय शिष्टमंडळ विविध देशांत पाठवण्यात येत आहे. या शिष्टमंडळावरून काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी भाजपवर टीका केली आहे. त्यांनी सर्वपक्षीय शिषअटमंडळ पाठवले यावर आक्षेप नाही. मात्र, पक्षाशी चर्चा करून नेत्यांची नावे ठरवण्यात यायला हवी होती. भाजपने या मुद्द्यातही राजकारण करत लोकशाहीतील पक्षपद्धतीचा अपमान केला आहे, अशी टीका जयराम रमेश यांनी केली आहे. तसेच आम्हाला या विषयवार राजकारण करायचे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारने 16 मे रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर लगेचच, राहुल गांधींनी किरण रिजिजू यांना औपचारिकपणे एक पत्र पाठवले, त्यात काँग्रेस पक्षाकडून चार नावे सुचवण्यात आली होती. काँग्रेस खासदारांचे शिष्टमंडळात असणे महत्त्वाचे होते, तर त्याबाबत पक्षाच्या नेत्यांशी चर्चा व्हायला हवी होती. ते आम्हाला नावे देण्यास सांगू शकले असते. आपल्या देशात राजकीय पक्ष लोकशाहीचे प्राण आहेत. पक्ष सरकार बनवतात, सरकार पक्ष बनवत नाही. आमच्याकडे पक्षव्यवस्था आहे, पण तुम्ही याचा अपमान केला आहे,असे रमेश म्हणाले.
VIDEO | Talking about Kiren Rijiju’s all-party delegation statement, here is what Jairam Ramesh (@Jairam_Ramesh ) says, “ That’s a lie. He had a conversation with Congress President (Mallikarjun Kharge) and Rahul Gandhi on 16 May. Immediately after that, a letter was sent to… pic.twitter.com/qmwDt3PhQA
— Press Trust of India (@PTI_News) May 19, 2025
हे कोणत्या प्रकारचे राजकारण आहे? शिष्टमंडळात जाणाऱ्या आमच्या खासदारांची नावे तुम्ही ठरवाल का? निवडलेल्या नावांबद्दल आम्हाला काही आक्षेप नाही. निवडलेले खासदार अनुभवी आणि तज्ज्ञ आहेत. त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून परराष्ट्र आणि संरक्षण धोरणावर काम करत आहेत. त्यामुळे नावाला आमचा आक्षेप नसून सरकारने शिष्टमंडळ निवडीसाठी केलेली प्रक्रिया चुकीची आहे. त्यांनी असे करायला नको होते, असे रमेश यांनी स्पष्ट केले.
या गंभीर मुद्द्यावर काँग्रेस पक्षाने देशाच्या एकजुटीची भूमिका मांडली. ऑपरेशन सिंदूरला आणि सरकार करत असलेल्या कारवाईला आम्ही पाठिंबा दिला. मात्र, सरकारने शिष्टमंडळ निवडताना पक्षाशी चर्चा केली नाही. तसेच पंतप्रधान 10 वर्षात ज्या देशात गेले, तेथे त्यांनी काँग्रेसचा अपमानच केला आहे. याआधी असे राजकारण कधीही करण्यात आले नव्हते. हे अत्यंत चुकीचे आहे, असेही रमेश यांनी म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List