तुम्ही अफगाणिस्तानात किती काळ होता? व्हिसावरून अमेरिकेचा हिंदुस्थानींना इशारा; नेटकऱ्यांनी घेतली फिरकी
हिंदुस्थानातील अमेरिकन दूतावासाने अमेरिकेत प्रवास करणाऱ्या हिंदुस्थानींना व्हिसाची मुदत संपल्यानंतर तेथे न राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच मुदत संपल्यानंतर तेथे राहिल्यास त्यांना एकतर हद्दपार केले जाईल किंवा भविष्यात अमेरिकेत प्रवास करण्यास कायमची बंदी घातली जाईल, असे दूतावासाने स्पष्ट केले. मात्र दूतावासाच्या इशाऱ्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकऱ्यांनी अमेरिकेची फिरकी घेतली. तुम्ही अफगाणिस्तानात किती काळ होता? असा मिश्कील प्रश्न एका नेटकऱ्याने केला.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थलांतरांविरोधात आक्रमक भूमिका घेतली असताना हिंदुस्थानातील अमेरिकन दूतावासाने हे फर्मान जारी केले. नेटकऱ्यांनी अमेरिकेला उद्देशून म्हटले की, हिंदुस्थानला भेट देणाऱ्या अमेरिकन नागरिकांनीही व्हिसा नियमांचे पालन करावे, अमेरिकेच्या सरकारने अनेकांना अपमानित करण्याचे पाप केले आहे. दरम्यान, एप्रिलच्या सुरुवातीला अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाच्या सचिव क्रिस्टी नोएम यांनी 30 दिवसांपेक्षा जास्त काळ अमेरिकेत राहणाऱ्या परदेशी नागरिकांना एलियन नोंदणी कायद्याची आठवण करून दिली होती.
इमिग्रेशन नियम आणखी कडक
डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अमेरिकेतील इमिग्रेशन नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. नवीन धोरणानुसार, अमेरिकेत 30 दिवसांपेक्षा जास्त काळ राहणाऱ्यांना नोंदणी करणे आवश्यक असेल. वर्क व्हिसा, स्टुडंट व्हिसा आणी टुरिस्ट व्हिसावर प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी अमेरिकेने चेतावणी जारी केली आहे. याआधी अमेरिकन दूतावासाने एक पोस्ट शेअर करून सरकार फसवणुकीला आळा घालण्यासाठी आणि बेकायदेशीर स्थलांतर थांबवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे म्हटले होते. दोषी लोकांवर अमेरिकेच्या प्रवासावर कायमची बंदी घालण्याचा इशारा देण्यात आला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List