राज्यात पुढील दोन दिवस वादळी पावसाचा अंदाज; मुंबईसह ठाण्यात सतर्कतेचा इशारा
पुढील दोन दिवस मुंबईसह ठाणे, पालघर भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी काही भागात गडगडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईत शनिवारी सकाळपासून पावसाने हजेरी लावली होती. वांद्रे, अंधेरी, बोरिवली, खास आणि गोरेगाव परिसरात सकाळपासूनच हलक्या सरी बरसल्या होत्या. आज रविवारी मुंबईसह ठाणे, पालघर भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. तर काही ठिकाणी गडगडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील दोन दिवस राज्यात वादळी पावसाचा इशारा कायम आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मुंबईतील अनेक भागात शनिवारी वळवाच्या पावसाने हजेरी लावली होती. वांद्रे, पवई, बोरिवली परिसरात शनिवारी सकाळपासूनच हलक्या सरी बरसल्या. मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरात अधिक पाऊस पडला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुजरात आणि उत्तर कोकणच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत आहेत. याचाच परिणाम म्हणून सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झालं आहे.
सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसंच यावेळी 50 ते 60 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील, असंही हवामान विभागाने सांगितलं आहे. अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात पुढील दोन दिवस वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भात काही ठिकाणी पुढील चार ते पाच दिवस विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातही पुढील पाच दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे.
सध्याच्या निरीक्षणांनुसार मुंबईत मान्सून लवकर येण्याची शक्यता आहे. कारण नैऋत्य मान्सून 27 मे पर्यंत केरळमध्ये दाखल होणार आहे. केरळ ओलांडल्यानंतर ते सर्वसाधारपणे सात ते दहा दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रात प्रवेश करतं. त्यामुळे मुंबईत 11 जूनपर्यंत मान्सूनचं आगमन होईल, असा अंदाज आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List