मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी; फक्त 60 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक
मुंबईच्या तलावात फक्त 60 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त 18 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांची पातळी साठवण क्षमतेच्या 18 टक्क्यांपर्यंत घसरली आहे. मुंबईकरांना पुढील 60 दिवस पाणीपुरवठा करता येईल, इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. परंतु, गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा सहा टक्के अधिक आहे. मुंबई महानगरपालिका परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
मुंबईला मोडक सागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार आणि भातसा या सात तलावातून दररोज 3 हजार 950 दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. यापैकी दोन तलाव मुंबईमध्ये आहेत, तर उर्वरित ठाणे, पालघर आणि नाशिकच्या शेजारच्या जिल्ह्यांमध्ये आहेत. पावसाळ्यात या तलावांचं पाणलोट क्षेत्र भरतं आणि हे पाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या फिल्टरेशन प्लांटमध्ये पोहोचवलं जातं. त्या पाण्याच्या शुद्धीनंतर घराघरात आणि व्यावसायिक आस्थापनांना पाणीपुरवठा केला जातो. सात तलावांमध्ये एकूण 14.4 लाख दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता असून बीएमसी दररोज 3850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करते.
गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील वाढते औद्योगिकीकरण आणि शहरीकरण यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. दरम्यान तानसा, मध्य वैतरणा, भातसा आणि अप्पर वैतरणा या प्रमुख पुरवठा तलावांमधील पाण्याची पातळी 20 टक्क्यांपेक्षा कमी झाली. बीएमसीने अप्पर वैतरणा आणि भातसा येथून 1.81 लाख दशलक्ष लिटरच्या राखीव साठ्यातून पाणी काढण्यासाठी राज्य सरकारची मान्यता मिळवली आहे.
महापालिका अधिकाऱ्यांच्या मते, मुंबईकरांना जुलै अखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. उष्णतेमुळे जलद बाष्पीभवन होत असल्याने तलावांमध्ये पाण्याची पातळी नेहमीपेक्षा वेगाने कमी होत असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. महापालिकेच्या अंदाजानुसार, एक टक्के पाणीसाठा सुमारे तीन दिवस पुरतो. दरम्यान गेल्या वर्षी मे महिन्यात पाण्याची पातळी झपाट्याने कमी झाल्याने 5 जून 2024 पासून 5 टक्के पाणीकपात करण्यात आलं होतं.
मुंबईत मान्सूनचं आगमन सर्वसाधारणपणे 15 जूनपर्यंत होतं. परंतु गेल्या काही वर्षांपासून मुंबईत मान्सूनचं उशिरा आगमन होतंय. जूनच्या शेवटच्या आठवड्यातच पावसाचा जोर वाढलेला दिसतो. विशेष म्हणजे या तलावांचं पाणलोट क्षेत्र हे पालघर, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये आहेत. तिथे जुलैच्या मध्यापूर्वी जोरदार पाऊस सुरू होत नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List