रणवीर अलाहबादियाने पाकिस्तानी लोकांची मागितली माफी; भडकून नेटकरी म्हणाले ‘याला तिथेच पाठवा..’
पॉडकास्टर आणि युट्यूबर रणवीर अलाहबादिया पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. भारत आणि पाकिस्तानदरम्यान संघर्षाचं वातावरण असताना त्याने सोशल मीडियावर अशी पोस्ट लिहिली आहे, जे वाचून भारतीय चांगलेच भडकले आहेत. या पोस्टमध्ये रणवीरने पाकिस्तानी लोकांची माफी मागितली आहे. 10 मे रोजी रणवीरने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये काही पोस्ट लिहिले होते. यातील एका पोस्टमध्ये त्याने पाकिस्तानी लोकांची माफी मागितली. ‘प्रिय पाकिस्तानी बंधू आणि भगिनींनो, यासाठी मला अनेक भारतीयांकडून द्वेष मिळेल, परंतु हे सांगणं महत्त्वाचं आहे. अनेक भारतीयांप्रमाणे माझ्या मनातही तुमच्याबद्दल द्वेष नाही. आपल्यापैकी अनेकांना शांती हवी आहे’, असं त्याने लिहिलंय.
रणवीरची पोस्ट-
या पोस्टमध्ये रणवीरने पुढे लिहिलं, ‘तुमचा देश सरकार चालवत नाही. तर तुमचं सैन्य आणि तुमची गुप्तहेर संस्था (ISI) चालवतेय. स्वातंत्र्यापासून या दोन खलनायकांनी तुमच्या अर्थव्यवस्थेचं नुकसान केलं आहे. भारतात सतत होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांसाठीही ते जबाबदार आहेत. जर आम्ही द्वेष पसरवत आहोत असं वाटत असेल तर मी मनापासून माफी मागतो. पाकिस्तानी लोकांना भेटलेले भारतीय तुम्हाला समजू शकतील. परंतु सध्या भारतीय आणि पाकिस्तानी मीडिया (न्यूज चॅनल्स) खोटी माहिती पसरवत आहेत. सीमेजवळील निष्पाप लोकांसाठी अनेकांना शांती हवी आहे. परंतु भारताला पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय पुरस्कृत दहशतवाद संपवायचा आहे.’
हा भारतीय लोकांविरुद्ध पाकिस्तानी लोकं असा संघर्ष नसून भारत विरुद्ध पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय असा संघर्ष आहे, असंही त्याने म्हटलंय. रणवीरच्या या पोस्टवर नेटकरी चांगलेच भडकले आहेत. ‘याला पाकिस्तानलाच पाठवा’ असं एकाने लिहिलं. तर ‘हा सुधारणार नाही’, असं दुसऱ्याने म्हटलंय. वाढत्या ट्रोलिंगनंतर रणवीरने त्याची पोस्ट डिलिट केली. पण त्याचे स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये रणवीर अलाहबादियाने एका स्पर्धकाला आईवडिलांबद्दल अश्लील प्रश्न विचारल्यानंतर मोठा वाद सुरू झाला होता. या शोचा कर्ताधर्ता कॉमेडियन समय रैना, रणवीर अलाहबादिया आणि इतर परीक्षकांविरोधात विविध राज्यांमध्ये एफआयआर दाखल झाले आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List