असे 2 बॉलीवूड सुपरस्टार जे जीवलग मित्र, एकाच वर्षी घटस्फोट अन् एकाच दिवशी घेतला जगाचा निरोप
जर बॉलिवूडमध्ये अभिनेते आणि अभनेत्री यांची जोडी जशी प्रसिद्ध असते त्याचपद्धतीने बॉलिवूडमधील अनेक जीवलग मित्र-मैत्रिणीही असतात. त्यांच्या मैत्रीचे किस्से नक्कीच चर्चेत असतात. तसं पाहायला गेलं तर अमिताभ बच्चन-धर्मेंद्र, सलमान-शाहरुख खान अशा अनेक स्टार्सची नावे समोर येतात. पण याआधीही बॉलिवूडमध्ये अशा 2 अभिनेत्यांच्या मैत्रीचे किस्से प्रसिद्ध आहे ज्यांच्याबद्दल आजही बोललं जातं. हे दोघेही अभिनेते सुपरस्टार. आणि एकमेकांचे जीवाभावाचे मित्र.
बॉलिवूडचे जीवलग मित्र
एवढंच नाही तर या दोघांची मैत्री इतकी घट्ट होती की एकाच वर्षी दोघांचाही घटस्फोट झाला आणि दोघांनीही एकाच वेळी जगाचा निरोप घेतला. आजही या दोन स्टार्सची मैत्री म्हणजे खऱ्या मैत्रीचे उत्तम उदाहरण आहे. हे दोन स्टार म्हणजे विनोद खन्ना आणि फिरोज खान. आज या दोन्ही सुपरस्टार्सची पुण्यतिथी आहे.
दोघेही सुपरस्टार
फिरोज खान आणि विनोद खन्ना यांच्यातील मैत्री 1979 मध्ये सुरू झाली. दोघांनीही एकत्र चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यानंतर, येथून सुरू झालेली दोघांची मैत्री त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहिली. विनोद आणि फिरोज दोघेही बॉलिवूडचे सुपरस्टार राहिले आहेत. विनोद खन्ना यांनी त्यांच्या कारकिर्दीत 150 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. एक काळ असा होता जेव्हा विनोद खन्ना यांचे स्टारडम सर्व अभिनेत्यांवर भारी पडत होतं. विनोद खन्ना मुलींमध्येही खूप लोकप्रिय होते. तर, फिरोज खान हे त्यांच्या अनोख्या शैलीसाठीही ओळखले जात होते. विनोद खन्ना आणि फिरोज खान दोघांनीही चित्रपटांमध्ये स्क्रीन शेअर केली.

एकाच वर्षी घटस्फोट आणि एकच वेळी निधन
विनोद खन्ना यांनी गीतांजलीशी लग्न केलं आणि लग्नाच्या काही वर्षांनी त्यांच्या नात्यात कटुता येऊ लागली. यानंतर विनोद खन्ना आणि गीतांजली यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. विनोद खन्ना यांनी 1985 मध्ये गीतांजलीला घटस्फोट दिला. पण काय योगायोग आहे की त्याच वर्षी फिरोज खान यांनीही त्यांची पत्नी सुंदरी हिला घटस्फोट देऊन नवीन आयुष्य सुरू केलं. दोघांनीही बराच काळ एकत्र काम केलं आणि त्यांची मैत्री कायम ठेवली.
पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोघांनीही एकाच आजारामुळे एकाच तारखेला या जगाचा निरोप घेतला. फिरोज खान यांना कर्करोग झाला होता आणि 2009 मध्ये त्यांनी 27 एप्रिलला या जगाचा निरोप घेतला. विनोद खन्ना यांनाही त्यांच्या शेवटच्या काळात कर्करोगाचा सामना करावा लागला आणि 2017 मध्ये 27 एप्रिलला त्यांचेही निधन झाले. दोघांचेही चित्रपट आणि गाणी अजूनही लोकांच्या मनात जिवंत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List