ऑपरेशन सिंदूरनंतर अभिनेत्याची शपथ; पुन्हा तिच्यासोबत करणार नाही काम
भारत-पाकिस्तानदरम्यान संघर्ष वाढत असताना अभिनेता हर्षवर्धन राणेनं अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्याच्या ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये जर पहिल्याच भागातील कलाकार घेतले तर काम करणार नसल्याचं त्याने जाहीर केलंय. 2016 मध्ये हर्षवर्धन राणे आणि पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘सनम तेरी कसम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट आजही प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय असून गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या सीक्वेलची जोरदार चर्चा आहे. परंतु भारत-पाकिस्तानदरम्यान सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आणि भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर मावराने सोशल मीडियावर जी पोस्ट लिहिली, त्यानंतर हर्षवर्धनने हा निर्णय घेतला आहे. म्हणजेच पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेनसोबत काम करण्यास त्याने स्पष्ट नकार दिला आहे.
हर्षवर्धनची पोस्ट-
‘अनुभवासाठी मी कृतज्ञ असलो तरी सध्याच्या घडामोडीदरम्यान थेट माझ्या देशाबद्दलचे कमेंट्स वाचल्यानंतर मी ‘सनम तेरी कसम 2′ या चित्रपटाचा भाग होण्यापासून आदरपूर्वक नकार देतो, जर त्यात पहिल्या भागातीलच कलाकार असतील तर मी त्यांच्यासोबत काम करणार नाही. मी सर्व कलाकार आणि या देशातील, त्या देशातील, केन्या आणि अगदी मंगळावरील लोकांचाही आदर करतो. पण माझ्या देशाबद्दल असं कोणी अपमानकारक वक्तव्य करत असेल तर ते माफ करण्यालायक नाही. मग माझे इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्स कमी झाले तरी चालतील, पण माझ्या अभिमानावर आणि संगोपनावर कोणालाच टीका करू देणार नाही. स्वत:च्या देशासोबत उभं राहणं चांगली गोष्ट आहे पण दुसऱ्या देशाबद्दल अनादरपूर्वक आणि द्वेषपूर्ण वक्तव्य करणं योग्य नाही’, असं त्याने लिहिलं आहे.
ऑपरेशन सिंदूरवर अनेक पाकिस्तानी कलाकारांनी टीका केली होती. ‘सनम तेरी कसम’मध्ये हर्षवर्धनसोबत काम केलेल्या मावराने भारतीय सैन्याच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली होती. मावराने ऑपरेशन सिंदूरवर टीका करत म्हटलं होतं, ‘निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अल्लाह आपल्या सर्वांचं रक्षण करो आणि हल्लेखोरांना सदबुद्धी देवो.’
‘सनम तेरी कसम’ हा चित्रपट 7 फेब्रुवारी 2025 रोजी पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. यावेळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 30 कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवला होता. तेव्हा निर्माते दीपक मुकुट यांनी या चित्रपटाच्या सीक्वेलची घोषणा केली होती. परंतु त्यात कोणकोणते कलाकार भूमिका साकारतील, हे अद्याप स्पष्ट नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List