‘प्रिय अनिकेत, तुझा संयम..’; मुलासाठी निवेदिता सराफ यांची भावूक पोस्ट
अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ ही कलाविश्वातील अत्यंत लोकप्रिय जोडी आहे. या दोघांना अनिकेत हा मुलगा आहे. मुलाच्या वाढदिवसानिमित्त निवेदिता यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. मुलासोबतचा सेल्फी पोस्ट करत त्यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांच्या मुला-मुलींनी अभिनयक्षेत्रातच करिअर केलंय. परंतु अशोक सराफ आणि निवेदित सराफ यांचा एकुलता एक मुलगा अनिकेतने आई-वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत अभिनयक्षेत्र करिअरसाठी निवडलं नाही. तर त्याने वेगळ्या क्षेत्रात पाऊल ठेवून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. अनिकेत हा व्यवसायाने शेफ आहे.
निवेदिता सराफ यांची पोस्ट-
‘माझा प्रिय अनिकेत.. माझ्या आयुष्यातील तू सर्वोत्कृष्ट गोष्ट आहेस. आज तू एक व्यक्ती म्हणून जसा आहेस, जसा बनलास, तुझा संजय, दयाळूपणा, सक्षमपणा पाहून मला तुझा खूप अभिमान वाटतो. यासाठी मला तुझं खूप कौतुक वाटतं. तुला खूप सारं प्रेम.. वाढदिवसाच्या शुभेच्छा’, अशा शब्दांत निवेदिता यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या या पोस्टवर स्वप्निल जोशी, शिल्पा तुळस्कर, आदिनाथ कोठारे, तेजश्री प्रधान, मंजिरी ओक, क्षिती जोग यांसारख्या सेलिब्रिटींनी कमेंट करत अनिकेतला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अनिकेतने फ्रान्समध्ये शिक्षण घेतलं असून तो पाश्चिमात्य पदार्थ उत्कृष्टपणे बनवतो. युट्यूबवर ‘निक सराफ’ या नावाने त्याचे व्हिडीओ खूप व्हायरल होतात. अनिकेत स्वत: सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असून तिथे तो विविध पदार्थ बनवतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करतो. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी 1990 मध्ये लग्न केलं. या दोघांच्या वयात 18 वर्षांचं अंतर आहे. निवेदिता यांचा जन्म 1965 मध्ये झाला. तर अशोक सराफ यांचा जन्म 1947 मध्ये झाला. अशोक सराफ हे निवेदिता यांच्यापेक्षा 18 वर्षांनी मोठे आहेत. ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘अशी ही बनवा बनवी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करताना ते एकमेकांच्या प्रेमात पडले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List