हा तर हिंदूमध्ये फूट पाडण्याचा प्रकार…मनसेची थेट सरसंघचालकांकडे तक्रार, त्या पत्राची एकच चर्चा, संघाला साकडे घातले काय?
हिंदीचा मुद्दा जसा तापला तशीच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकीची चर्चा रंगली आहे. राज्यातील राजकारण पुन्हा कूस बदलणार का? असा सवाल उपस्थित होत असतानाच मनसेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये तक्रारीचा सूर आळवण्यात आला आहे. थेट सरसंघचालकांनाच पत्र लिहिल्याने आता हिंदी सक्तीप्रकरणात संघ काय भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काय आहे पत्र?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना हे पत्र लिहिले आहे. राज्य सरकारने शैक्षणिक धोरणातंर्गत इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा करण्याचे जाहीर केले आहे. त्याविरोधातील सूर या पत्रात आवळण्यात आला आहे. संदीप देशपांडे यांनी हे पत्र खास सरसंघचालकांना लिहिले आहे. मनसेने संघाने या प्रकरणात दखल द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
पत्रातील मजकूर काय?
संदीप देशपांडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची पत्रात उजळणी केली आहे. मराठ्यांनी जवळ जवळ सर्व भारतावर राज्य केले. इंग्रजांनी हिंदुस्थान मोघलांकडून नाही तर मराठ्यांकडून जिंकला. शिंदे ग्वालियरमध्ये, गायकवाड बडोद्यामध्ये, दक्षिणेत तंजावर येथे मराठ्यांचे राज्य होते. जवळ जवळ 200 वर्ष हिंदुस्थानवर मराठ्यांचे राज्य होते. पण मराठ्यांनी त्या त्या भागात कधीच मराठी भाषा लादली नाही. गुगल नसताना सुद्धा त्यावेळी मराठ्यांना मराठी ही संपर्काची भाषा करावीशी वाटली नाही. उलटपक्षी शिंदे हे ग्वाल्हेर येथे जाऊन सिंधिया झाले.
हिंदीची सक्ती नकोच pic.twitter.com/l6xoD6FSlz
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 20, 2025
हे तर हिंदू धर्मात फूट पाडण्याचे काम
मराठी माणूस हा सहिष्णु आहे. त्याचा गैरफायदा घेण्यात येत आहे. मराठी माणूस हा सुद्धा हिंदूच आहे. गुजराती, तामिळ बोलणार हा सुद्धा हिंदूच आहे. ख्रिस्ती धर्म वाढवण्यासाठी तामिळ, मल्याळम, कोंकणी ही बोलीभाषा आत्मसात करण्यात आली. हे सर्व सांगण्याचे कारण एकच आहे की धर्म वाढवायचा असेल टिकवायचा असेल तर सर्व भाषांना सामावून घेणे गरजेचे आहे. एका समूहाची भाषा दुसर्या समूहावर लादून धर्म वाढू शकत नाही. पाकिस्तानातील बंगाली बोलणारे मुसलमानांनी भाषेआधारीत स्वतंत्र राष्ट्र घेतले हा इतिहास ताजा आहे.
ज्या पद्धतीने सरकार हिंदी भाषेची सक्ती करून हिंदू समाजात फूट पाडण्याचे काम करत आहे. त्यामुळे हिंदू समाज हा एकत्र येण्याऐवजी विखुरण्याचीच शक्यता अधिक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एक वैचारिक अधिष्ठान आहे आणि ही संघटना विचारांच्या आधारावर उभी आहे. म्हणूनच हे सांगण्याचे धाडस करत आहोत. हिंदू धर्मामध्ये फूट पाडण्याच्या या कृतीला आपण चाप बसवाल हा आमचा ठाम विश्वास आहे, अशी अपेक्षा या पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे. तसेच प्रत्यक्ष भेटीत याविषयीच्या भावना व्यक्त करणार असल्याचे संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे. हिंदी सक्तीकरणाविरोधात मनसे मैदानात उतरली आहे. आता या प्रकरणात संघाने दखल द्यावी असे साकडे मनसेने घातले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List