साताऱ्यातील कारखानदारांकडून ऊसदर जाहीर, पालकमंत्री देसाईंच्या कारखान्याकडून सर्वांत नीचांकी दर शेतकरी संघटना आंदोलनावर ठाम
साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन पंधरा दिवस उलटून गेले तरी मंत्री मकरंद पाटील, भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याशी संबंधित सातारा जिह्यातील साखर कारखान्यांनी अद्यापही ऊसदर जाहीर केलेला नाही. एकीकडे जिह्यातील कृष्णा, सह्याद्री, अजिंक्यतारा, तसेच जरंडेश्वर कारखान्यांनी प्रतिटन साडेतीन हजार रुपये दर जाहीर केला असताना पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या कारखान्याने मात्र सर्वांत नीचांकी तीन हजार रुपये दर निश्चित केला आहे. कारखान्यांनी ऊसदर जाहीर केला असला तरी शेतकरी संघटना मात्र आंदोलनावर ठाम आहेत.
साखर कारखान्यांचे गळीत हंगाम दिवाळीत सुरू झाले आहेत. यादरम्यान साखर कारखाने यंदा उसाला काय दर जाहीर करतात, याकडे शेतकरी डोळे लावून बसले होते, परंतु साखर कारखानदार दराबाबत चकार शब्द काढत नव्हते. एरवी शेतकरीहिताच्या गप्पा मारणारे कृष्णा, सह्याद्रीसारखे काही सन्माननीय अपवाद वगळता अन्य साखरसम्राट ऊसदरप्रश्नी जिह्यात आंदोलने सुरू झाली तरी ढीम्मच दिसले.
मंत्री मकरंद पाटील यांच्या गटाची सत्ता असलेल्या किसनवीर सहकारी साखर कारखाना, खंडाळा शेतकरी साखर कारखाना, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याकडील स्वराज आदी साखर कारखान्यांनी अद्यापही ऊसदर जाहीर केलेले नाहीत. वर्षभर शेतात राबणारा शेतकरी दराकडे लक्ष लावून बसला असताना, या कारखान्यांनी ती संवेदनशीलता दाखवलेली नाही.
शेवटी आंदोलनाची व्याप्ती वाढू नये, यासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सर्व साखर कारखान्यांचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात बोलाविली होती. ज्या कारखान्यांनी ऊसदर जाहीर केले नाहीत, त्यांनी दर तातडीने जाहीर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले. या बैठकीस पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता अभय काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, जिल्हा उपनिबंधक संजय सुद्रिक, प्रादेशिक उपसंचालक (साखर) प्रशांत सूर्यवंशी, विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था (साखर) अजय देशमुख, सदाशिव गोसावी यांच्यासह साखर कारखान्यांचे प्रतिनिधी व शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List