सातपाटी समुद्रातील मुरबे बंदराचे सर्वेक्षण ग्रामस्थांनी रोखले, संतप्त महिला पाण्यात उतरल्या
विनाशकारी वाढवण बंदरानंतर सातपाटी किनारपट्टीवर जिंदाल कंपनीमार्फत मुरबे बंदर उभारण्याचा घाट घालण्यात आला आहे. या बंदराला स्थानिक मच्छीमार व ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला असून आज सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना रोखण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत आम्ही सर्वेक्षण होऊ देणार नाही, असा नारा देत संतप्त महिलादेखील समुद्रातील पाण्यात उतरल्या.
मुरबे बंदरासंदर्भात जनसुनावणीलादेखील स्थानिकांनी विरोध केला होता. सातपाटी समुद्रात केंद्रीय जल आणि वीज संशोधन केंद्रामार्फत आज सर्वेक्षण करण्यासाठी पथक दाखल झाले. ही बाब समजताच असंख्य महिला व ग्रामस्थांनी बंदराकडे धाव घेतली. ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता तुम्ही सर्वेक्षण कसे काय करता, असा थेट सवाल करण्यात आला. मुरबे बंदराविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.
सर्वेक्षणासाठी समुद्रात नेण्यात आलेली बोट महिला व ग्रामस्थांनी पाण्यात उतरून रोखली. यावेळी सर्वेक्षण करणारे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांमध्ये तब्बल चार तास संघर्ष झाला. ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे लक्षात येताच सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेने त्वरित प्रक्रिया थांबवली आणि काढता पाय घेतला. अधिकारीवर्ग माघारी जात असताना सातपाटीवासीयांनी त्यांच्या गाड्या रोखल्या.
बळाचा वापर कराल तर याद राखा..
अनेक ग्रामस्थ व सर्वेक्षण करणारे अधिकारी यांच्यात पोलिसांनी अखेर मध्यस्थी केली. त्यानंतर सातपाटीच्या राममंदिरात बैठकही आयोजित करण्यात आली. यावेळी जोवर ग्रामसभा आणि ग्रामपंचायतीची परवानगी घेत नाही तोपर्यंत सर्वेक्षण होऊ देणार नाही. बळाचा वापर कराल तर याद राखा. संपूर्ण गाव प्रतिकार करेल, असा इशारा देण्यात आला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List