सावत्र मुलाला स्टंपने मारहाण चटकेही दिले; आईवडिलांवर गुन्हा
सावत्र आईसह वडिलांनी 11 वर्षीय मुलाला स्टंप आणि हाताने बेदम मारहाण केल्याची तसेच चटके दिल्याची घटना 16 नोव्हेंबरला सकाळी खराडीतील इस्टर्न मिडोज सोसायटीमध्ये घडली. या प्रकरणी सोसायटीधारकांनी पुढाकार घेत खराडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर सावत्र आईसह वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित 11 वर्षीय मुलगा सोसायटीच्या गेटवर सुरक्षारक्षकाच्या केबिनमध्ये रडत होता. सोसायटीचे चेअरमन विश्वनाथ घुले यांना ही माहिती मिळाली. परंतु घुले हे बाहेर असल्यामुळे त्यांनी सोसायटीतील रहिवासी आनंद शिंदे यांना संपर्क करून माहिती दिली. शिंदे घरीच असल्यामुळे तत्काळ गेटवर गेले असता त्या ठिकाणी मुलगा रडत असल्याचे दिसून आले. शिंदे यांनी त्या मुलाची विचारपूस केली असता त्याने आईवडिलांनी मला लाटण्याने व स्टंप तसेच हाताने मारहाण केल्याचे सांगितले.
शिंदे यांनी चाइल्ड हेल्पलाइन व पोलिसांशी संपर्क करून घटनेची माहिती दिली. पोलीस आल्यानंतर मुलाची विचारपूस केली. मुलाच्या मानेवर, छातीवर, हातावर, बरगडीखाली आणि पोटावर मारहाणीचे तसेच भाजल्याचे व्रण दिसून आले. त्याचे टी-शर्टही फाटलेले होते. यापूर्वीही तीन महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे मारहाणीची तक्रार सोसायटीतील सुरक्षारक्षकाकडे मुलाने केली होती. त्या वेळी सोसायटीतील सदस्यांनी मुलाचे वडील आणि आईला समजावले होते. त्या वेळी त्यांनी मुलाला त्रास देणार नसल्याचे सांगितले. मात्र त्याच्या आईने त्याला मारहाण केली. मारहाण करणारी महिला मुलाची सावत्र आई आहे. तिला तिच्या पहिल्या नवऱयापासून एक मुलगी आहे. किरकोळ कारणावरून ती वारंवार मुलाला मारहाण करत होती. चौकशीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List