मांडव्याहून अलिबागला चला सुसाट ! प्रवासी, पर्यटकांची वाहतूककोंडीतून सुटका; अवजड वाहनांना दिवसभरात आठ तास बंदी
शनिवार, रविवारचा मुहूर्त साधत असंख्य पर्यटकांची पावले अलिबागच्या निसर्गरम्य किनाऱ्यांकडे वळतात. मात्र अनेकदा तासन्तास वाहतूककोंडीत अडकलेल्या पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडते. मात्र आता यातून पर्यटकांची सुटका होणार आहे. वाहतूककोंडीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आजपासून अलिबाग-मांडवा मार्गावर अवजड वाहनांना दिवसातून दोन वेळा आठ तास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांना आता ट्रॅफिक जामचे टेन्शन न घेता मांडव्याहून अलिबागला सुसाट जाता येणार आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मांडवा, किहीम, आक्षी, नागावच्या निळाशार समुद्राचा आनंद लुटण्यासाठी हजारो पर्यटकांच्या लाटा उसळतात. त्यामुळे या मार्गांवर नेहमीच वाहतूककोंडी होते. त्यातच मांडवा जेट्टी येथे जलप्रवासी वाहतूक बोटी तसेच रो-रो सेवा सुरू असल्याने त्यामधून मुंबईसह विविध राज्यांतून पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वाहने येतात. विकेंडच्या दिवशी तर पर्यटकांची तुफान गर्दी होते. मांडवा जेट्टी ते अलिबाग हा मार्ग अरूंद असल्यामुळे या ठिकाणी अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी १८ नोव्हेंबरपासून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर तात्पुरती बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे.
या वाहनांना एण्ट्री
अपघात, वाहतूककोंडी यांची गंभीर दखल घेऊन वाहतूक विभागाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अलिबाग-मांडवा या मार्गावर सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत तसेच सायंकाळी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला, पाणी इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने तसेच पोलीस, फायर ब्रिगेड आणि रुग्णवाहिका या वाहनांना हे निर्बंध लागू नसणार आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List