कानपूरमध्ये भाजपच्या बैठकीत जुंपली; खासदार-माजी खासदार एकमेकांना भिडले, तुंबळ हाणामारी
भाजपमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येत आहेत. कानपूरमध्ये पक्षाच्या बैठकीतच तुंबळ हाणामारी झाली आहे. पक्षाच्या खासदार आणि माजी खासदारांमध्ये चांगलीच जुंपली आणि त्यांनी थेट हाणामारीलाच सुरुवात केली. कानपूर देहातमध्ये भाजप खासदार देवेंद्रसिंह भोले आणि माजी खासदार अनिल शुक्ला वारसी यांच्यात वाद झाला, ज्यामुळे हाणामारी झाली. त्यामुळे भाजपमधील या वादाची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
कानपूर देहातमध्ये दिशा सभेदरम्यान भाजप खासदार देवेंद्रसिंह भोले आणि माजी खासदार अनिल शुक्ला वारसी यांच्यात जोरदार वाद झाला. वारसी यांनी भोले यांच्यावर खंडणी आणि समितीचा गैरवापर केल्याचा आरोप केला, तर भोले यांनी प्रत्युत्तर देत वारसी कायद्याचे उल्लंघन करत असल्याचे म्हटले. त्यानंतर त्यांच्यात तुंबळ हाणामारी सुरू झाली, त्यामुळे बैठक तहकूब करण्यात आली.
उत्तर प्रदेशातील कानपूर देहात येथे जिल्हा विकास समन्वय आणि देखरेख समितीच्या बैठकीत या वादामुळे गोंधळ उडाला. या बैठकीदरम्यान अकबरपूर येथील भाजप खासदार देवेंद्रसिंह भोले आणि माजी खासदार अनिल शुक्ला वारसी यांच्यात वाद झाला. विकासकामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित ही बैठक दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या वादविवाद आणि गंभीर आरोपांमुळे तहकूब करावी लागली.
भाजप नेते आणि माजी खासदार अनिल शुक्ला वारसी यांनी खासदार देवेंद्रसिंह भोले यांच्यावर दिशा समितीचा गैरवापर केल्याचा आरोप केला. त्यांनी म्हटले की भोले यांनी त्यांच्याच काही लोकांना समितीचे सदस्य म्हणून जबरदस्तीने नियुक्त केले आहे, जे लोकांना लक्ष्य करतात आणि अपमानित करतात. खोटे खटले दाखल करतात आणि कारखाना मालकांकडून पैसे उकळतात. खासदार भोले यांना उपचारांची गरज असल्याचे सांगून वारसी यांनी त्यांना गुंडांचे म्होरक्या असे संबोधले. प्रत्युत्तरात खासदार देवेंद्रसिंह भोले यांनी वारसी यांच्यावर वातावरण बिघडवण्याचा आणि प्रत्येक निवडणुकीपूर्वी अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्याचा आरोप केला. हा वाद हाणामारीवर पोहचला.
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे बघताच घटनास्थळी उपस्थित असलेले पोलिस अधीक्षक आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षकांनी हस्तक्षेप केला. दोन्ही प्रमुख नेत्यांमधील वाढत्या तणावामुळे, विकासाच्या अजेंडावरील ही महत्त्वाची बैठक पुढे ढकलण्यात आली, ज्यामुळे जिल्ह्यात राजकीय तणाव आणखी वाढला. खासदार आणि माजी खासदार यांच्यातील राजकीय वर्चस्वासाठी आहे. माजी खासदार वारसी हे योगी सरकारमधील राज्यमंत्री प्रतिभा शुक्ला यांचे पती आहेत. काही महिन्यांपूर्वी प्रतिभा शुक्ला यांनीही वीज वादावरून निषेध केला होता. त्यावेळी हा मुद्दा जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा प्रमुख विषय होता. त्यामुळे आता या वादाची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List