Ratnagiri News – संगमेश्वर येथे राष्ट्रीय महामार्ग दिवसा बंद ठेवण्यास परवानगी नाकारली, पूलाचे गर्डर रात्रीच्या वेळी चढवणार
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सोनी चौक येथे उभारण्यात येत असलेल्या पुलाच्या गर्डरचे काम दिवसा राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवून करण्यास परवानगी न मिळाल्याने आता गर्डर चढवण्याचे काम रात्रीच्या वेळी हाती घेतले गेले आहे. सोमवारी रात्री दोन गर्डर चढवण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सोनवी चौक येथील पुलाचे काम गेली पाच वर्षे अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या संथ गतीने सुरू असणाऱ्या कामाचा त्रास संगमेमेश्वर येथील व्यापारी वर्गासह वाहन चालक आणि पादचाऱ्यांना होत असतानाच पूलाचे गर्डर चढवण्याच्या कामासाठी संगमेश्वर येथे राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवण्याचा घाट ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाने घातला होता. राष्ट्रीय महामार्ग दिवसा ठराविक वेळेत बंद ठेवण्यास संगमेश्वर वासीयांनी तीव्र विरोध दर्शवला. याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभाग अथवा ठेकेदार कंपनीने कोणालाही विश्वासात घेतले नव्हते.
राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम पाहता आधीच संगमेश्वरवासीय विविध कारणांनी त्रस्त आहेत. अशा स्थितीत संगमेश्वर येथे दिवसाच्या वेळी राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवल्याने शाळकरी विद्यार्थी, महिला, रुग्ण, व्यापारी पादचारी आणि वाहन चालक यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागणार होता. राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवण्यास स्थानिकांनी जोरदार विरोध केल्यानंतर ठेकेदार कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग यांनी नमते घेऊन सोनवी पुलाचे गर्डर चढवण्याचे काम रात्रीच्या वेळीच करण्याचा निर्णय घेतला आहे.
गर्डर चढवण्याच्या कामासाठी संगमेश्वर येथे दोन भव्य क्रेन आणण्यात आल्या असून या क्रेनद्वारे सोमवारी सायंकाळी गर्डर चढवण्याचे काम हाती घेण्यास सुरुवात करण्यात आली. प्रत्यक्षात रात्रीच्या वेळी हे काम खऱ्या अर्थाने तांत्रिक दृष्टीने सुरू करण्यात आले. पुलाच्या पिलर्सवर गर्डर कसे चढवले जातात, हे पाहण्यासाठी संगमेश्वर मधील उत्साही मंडळींनी मोठी गर्दी केली होती. रात्री सुरू झालेले काम पहाटेपर्यंत सुरूच होते. या दरम्यान देवरुख मार्गावरील दोन गर्डर सुरक्षितपणे पिलर्सवर चढवण्यात आले. यावेळी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंते, ठेकेदार कंपनीचे अभियंते, पोलीस कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.
प्रशासनाला धन्यवाद!
संगमेश्वर येथे राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवण्यास आम्ही विरोध केला होता. राष्ट्रीय महामार्ग विभागाने अथवा ठेकेदार कंपनीने संगमेश्वरवासीयांचा अंत पाहू नये, असा इशाराही देण्यात आला होता. जिल्हा प्रशासनाने संगमेश्वरवासीयांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन सोनवी पुलाच्या गर्डरचे काम करण्यास दिवसा राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवण्याची परवानगी नाकारून संगमेश्वर वासियांच्या भावना समजून घेतल्याबद्दल आम्ही प्रशासनास धन्यवाद देतो. – परशुराम पवार, पदाधिकारी प्रवासी वाहतूक संघटना संगमेश्वर.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List