बांगलादेशात 10 तास अडकले हिंदुस्थानी तिरंदाज, हिंसाग्रस्त रस्त्यावरून सुरक्षेशिवाय लोकल बसने नेले, खेळाडूंचा निकृष्ट दर्जाच्या धर्मशाळेत मुक्काम
आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धा गाजवून मायदेशी परतण्यापूर्वी 11 हिंदुस्थानी खेळाडू सोमवारी तब्बल दहा तास बांगलादेशात अडकले होते. त्यांच्या ढाक्यातून सुटणाऱ्या विमानाला वारंवार उशीर झाल्याने अखेर ते रद्द करण्यात आले. या काळात त्यांना कोणतीही सुरक्षा न देता ढाक्याच्या हिंसाग्रस्त भागातून एका स्थानिक बसने हलविण्यात आले आणि नंतर अतिशय खराब अवस्थेतील एका धर्मशाळेत ठेवण्यात आले. त्यामुळे खेळाडूंना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
हिंदुस्थानी संघातील अनुभवी कंपाऊंड तिरंदाज अभिषेक वर्मा याने मायदेशात परतल्यानंतर सांगितले की, ‘आम्ही शनिवार रात्री 9.30 वाजता दिल्लीला जाणाऱ्या फ्लाइटसाठी ढाका विमानतळावर पोहोचले होतो. फ्लाइटच्या उड्डाणाची वेळ 15 नोव्हेंबरला रात्री 10.05 वाजता होती. विमानात बसल्यानंतर तांत्रिक बिघाडामुळे फ्लाइट उड्डाण करू शकत नाही, अशी माहिती देण्यात आली. त्यामुळे आम्हा खेळाडूंना मध्यरात्री दोन वाजेपर्यंत टर्मिनलमध्येच थांबावे लागले. शेवटी फ्लाइट रद्द झाल्याचे सांगण्यात आले आणि त्या रात्री कोणतीही पर्यायी उड्डाणाची सोयही केली जाणार नाही, असेही स्पष्ट झाले. एअरलाइनकडून आम्हाला कोणतीही मदत मिळाली नाही.’
विमानतळाबाहेर आल्यानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली. अभिषेक वर्माने आरोप केला की, ‘आम्हाला खिडक्या नसलेल्या एका भरगच्च स्थानिक बसमधून नेण्यात आले. सुमारे अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेल्या एका तात्पुरत्या लॉजमध्ये नेण्यात आले, जे एका धर्मशाळेसारखे होते. त्या धर्मशाळेत सहा खाटांची एकच खोली होती आणि एकच घाणेरडे स्वच्छतागृह होते, ज्यात आंघोळ करणेही कठीण होते.’ त्यांच्यासोबत वरिष्ठ तिरंदाज ज्योती सुरेखा आणि ऑलिम्पियन धीरज बोम्मादेवरा यांचाही समावेश होता.
ढाक्यात हिंसेचे वातावरण
त्या काळात ढाका शहरात मोठय़ा प्रमाणावर हिंसा उसळली होती. रविवार, 16 नोव्हेंबर या दिवशी संपूर्ण वातावरण तणावपूर्ण होते. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधातील प्रकरणाचा निकाल येण्याची प्रतीक्षा होती. अखेर सोमवार, 17 नोव्हेंबर रोजी स्पेशल ट्रिब्युनलने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली.
अनेक खेळाडूंच्या कनेक्टिंग फ्लाइट्स सुटल्या
हिंदुस्थानी तिरंदाजी संघ रविवारी सकाळी 7 वाजता परत विमानतळाकडे रवाना झाला, मात्र दिल्लीला पोहोचल्यानंतरही त्यांची अडचण संपली नाही. उड्डाण उशिरा झाल्यामुळे अनेक तिरंदाजांच्या हैदराबाद आणि विजयवाडाकडे जाणाऱ्या कनेक्टिंग फ्लाइट्स चुकल्या. त्यामुळे अनेकांना शेवटच्या क्षणी महागडी तिकिटे घेऊन पुढील प्रवास करावा लागला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List