मुद्दा- निवडणुका जवळ आल्याची लक्षणे!
>> अजित कवटकर, [email protected]
लोकप्रतिनिधी आणि राजकीय कार्यकर्ते जेव्हा जमिनीवर म्हणजेच लोकांमध्ये अवतरतात, तेव्हा समजावे की लवकरच निवडणुकांचा साक्षात्कार घडणार आहे. निवडणुका या लोकशाहीचा निर्णायक आवाज होय आणि महाराष्ट्राच्या दाबून ठेवलेल्या याच आवाजाला आता जवळ जवळ एका दशकानंतर व्यक्त होण्याची संधी प्राप्त होणार आहे. अर्थात, प्रत्यक्षात जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील तेव्हाच त्या आपण खऱ्या मानू. असे असले तरी या निवडणुका जवळ आल्याची लक्षणे (symptoms) सध्या स्पष्टपणे दिसू लागली आहेत.
बाजूने गेले तरी कधी न बघणारे किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणारे राजकारणी जेव्हा तोंड फाटेपर्यंत स्मितहास्य करून आपले लक्ष त्यांच्याकडे वेधून घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्याहीपलीकडे जाऊन संवाद साधण्यासाठी पुढाकार घेतात, तेव्हा समजावे त्यांची परीक्षा जवळ आली आहे. प्रजेला अचानक राजा म्हणजेच ‘मतदार राजा’ म्हणून संबोधले जाऊ लागते. हात जोडलेला दिसू लागतो. कपडे साधे व सॉफ्ट रंगाचे होतात. पाच वर्षांत कधी न दिसलेल्या समस्या अचानक दिसण्याची दृष्टी प्राप्त होते व त्याविरुद्ध बोलण्यासाठीचा त्यांना अचानक कंठ फुटतो. सोशल मीडियाच्या प्रत्येक प्रभावी प्लॅटफॉर्मवर यांचे प्रमोशन सक्रिय होते. मतदारसंघात होणाऱ्या बारशापासून ते अंत्ययात्रेत त्यांची उपस्थिती दिसते. जुन्याजाणत्या, पण बाजूला पडलेल्या ज्येष्ठ-वरिष्ठांना आता आमंत्रणे येऊ लागतात आणि त्यांच्या आशीर्वादांची व मार्गदर्शनाची अचानक गरज निर्माण होते.
भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा अचानक पाऊस पडू लागतो. रोज नवनवीन भानगडी परस्परविरोधी आरोपांतून बाहेर पडतात. पक्षापक्षांत चिखलफेकीचा खेळ सुरू होतो. विरोधी पक्षाला किंवा विरोधकांना अडकवण्याचेच नव्हे, तर पक्षांतर्गत विरोधकांचा व प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढण्याची षड्यंत्रे आकार घेऊ लागतात. त्यातून पक्षांतराला प्रोत्साहन मिळते. समाजात ज्यांच्या शब्दाला वजन आहे, मान आहे अशांना आपल्याकडे खेचण्यासाठी साम, दाम, दंड, भेद, नीती वापरली जाऊ लागते. कधीच न फिरकणारे आता मत मागण्यासाठी अनेकदा दारावर येण्याचा विक्रम करतात. बाबा-बुवा, ज्योतिषांची मागणी वाढते. निवडणुकीचा प्रत्येक कार्यक्रम संस्मरणीय, परिणामकारक, चर्चेचा विषय ठरण्यासाठी ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ कंपन्यांना कामे दिली जातात. नवनवीन स्कीम, प्रकल्प, संधींवर चर्चा करण्यासाठी नागरिकांच्या सभा आयोजित होऊ लागतात. एरवी एकसंघ असलेला समाज आता पक्षीय कल वा राजकीय प्राधान्यावर विभागलेला दिसतो. जात, धर्म, अस्मिता वगैरे यांना नवीन झळाळी दिली जाते. इतिहासाची उजळणी सुरू होते. धर्म, जात, भाषा यांची समीकरणे मांडून कोणाला कोणाशी भिडवायचे हे शिजायला सुरू होते. पाण्याला आग लागावी अशी भाषणे कानी पडू लागतात. नरेटिव्ह सेट करणाऱ्या इमोशनल नाटकांचे रील व्हायरल होऊ लागतात. व्होट बँक पॉलिटिक्समुळे एखाद्या समाज घटकावर अचानक मेहेरबानी सुरू होते. लोकशाहीचा पाठ पढवला जातो आणि तुमचे एक मत किती अमूल्य आहे याची तुम्हाला शंभरदा आठवण करून दिली जाते. ‘रात्रीचे खेळ’ सुरू होतात आणि सांताक्लॉजने यावे व भेट देऊन जावे याप्रमाणे पक्षाचे कार्यकर्ते अचानक घरी येऊन जातात. निवडणुकीची पूर्वसंध्या ही उत्सव व उत्सवाचा परमोच्च शिखर गाठते.
उमेदवारांकडून निवडणुकीमध्ये होणाऱ्या अनधिकृत छुप्या खर्चाचा हिशेब केला तर एरवी विकसनशील समजला जाणारा भारत हा सर्वात विकसित असा जगाचा पोशिंदा वाटू लागेल. निवडणुकांवेळी होणारी सेवा, दानधर्म, परोपकार तर देवालाही लाजवेल. निवडणूक प्रचारातील नेत्यांची सर्वसमावेशकता दर्शवणारी भाषणे ऐकली तर वाटेल या देशात जात, धर्म, भाषा, पंथ वगैरेसारखे भेदाभेद औषधालाही सापडणार नाहीत. राजकीय पक्षांच्या वचननाम्यातील उदारता तर असा भास निर्माण करते की, इथे माणसाने फक्त जन्म घेण्याचे कष्ट घ्यावेत, बाकी पुढच्या जगण्याची सगळी व्यवस्था हेच बघणार. अर्थात, स्वर्गाहून सुंदर अशी ही स्वप्नवत परिस्थिती तुम्ही तुमचे मत टाकताच त्या ईव्हीएमवर वाजणाऱ्या ‘बीप’च्या आवाजाबरोबरच बदलते, संपते. कोणीतरी जागे करत म्हणतेय की, आता तुम्हाला मूर्ख बनविण्यासाठी परत पाच वर्षांनंतर भेटू. विवेकबुद्धी गहाण ठेवून, हरवून आपण या नाटकात सामील झालात, फसलात त्याबद्दल धन्यवाद. हा पश्चात्तापाचा भाव आता सवयीप्रमाणे प्रत्येक निवडणुकीनंतर आपसूकच आणि नैसर्गिकपणे प्रत्येक मतदाराच्या मनात उत्पन्न होतोच होतो. तेव्हा निवडणुकीनंतर जर डोक्याला हात लावण्याची वेळ येणारच असेल तर निदान निवडणुकीपूर्वी त्या जवळ आल्याची मजेशीर लक्षणे आणि त्यामधील राजकीय नौटंकीची गंमत अनुभवण्यापासून स्वतःला का वंचित ठेवता?
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List