जपानमध्ये १ लाख वृद्धांनी ओलांडली वयाची शंभरी, बनला जगातील सर्वाधिक वृद्ध लोकसंख्या असलेला देश
जपानमध्ये १०० वर्षांहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या १ लाखांवर पोहोचली आहे, अशी माहिती एका ताज्या अहवालातून समोर आली आहे. जपानचे आरोग्य मंत्री ताकामारो फुकुओका यांनी शुक्रवारी सांगितले की, ८७,७८४ महिला आणि ११,९७९ पुरुष १०० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. पुरुष आणि महिलांसह एकूण ९९,७६३ वृद्धांनी वयाची शंभरी ओलांडली आहे. त्यापैकी ८८ टक्के महिला आहेत. हे देशाच्या एकूण १२.४ कोटी लोकसंख्येच्या ०.८१ टक्के आहे. जपानने सलग ५५ व्या वर्षी हा विक्रम केला आहे.
जपानमध्ये १५ सप्टेंबर रोजी वृद्ध दिन साजरा केला जातो. या दिवशी जपानी पंतप्रधान १०० वर्षांवरील वृद्धांना अभिनंदन पत्रे आणि चांदीचे चष्मे देतात. यावेळी ५२,३१० वृद्धांना हा सन्मान दिला जाईल. देशातील सर्वात वृद्ध महिला शिगेको कागावा आहेत, त्या ११४ वर्षांच्या आहेत आणि सर्वात वृद्ध पुरुष कियोताका मिझुनो आहेत, जे १११ वर्षांचे आहेत.
दरम्यान, जपानमधील आयुर्मान ९५.१ आहे, म्हणजेच येथील लोकांचे सरासरी वय ९५ वर्षे आहे. वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू २०२४ च्या आकडेवारीनुसार, जगातील ज्या देशांमध्ये लोकांचे सरासरी वय सर्वाधिक आहे त्यामध्ये जपान चौथ्या स्थानावर आहे. यामध्ये महिला पुरुषांपेक्षा जास्त काळ जगतात.
वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू २०२५ च्या आकडेवारीनुसार, जगातील सर्वात निरोगी देशांमध्ये जपान दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा अहवाल आयुर्मान, लठ्ठपणा, मधुमेह, आनंद आणि आरोग्यावरील खर्चाच्या आधारे तयार करण्यात आला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List