खाद्यसंस्कृती – उत्सव बाप्पाचा, चंगळ खवय्यांची

खाद्यसंस्कृती – उत्सव बाप्पाचा, चंगळ खवय्यांची

>> स्नेहल बनसोडेशेलुडकर

गणेशोत्सवात नैवेद्याच्या पदार्थांत मानाचं पान उकडीच्या मोदकांना असलं तरी घरोघरी चविष्ट पदार्थांची रेलचेल असते. गणेशाच्या नैवेद्यांत प्रांतवार बदल होताना त्याचा स्वाद, रंगरूप आणि त्यांची खासियत वैशिष्टय़पूर्ण ठरते.

गणपती बाप्पा…’’ अशी आरोळी ऐकली की, मराठी माणूस मनातल्या मनात का होईना, “…मोरया, मंगलमूर्ती मोरया!’’ अशी आरोळी ठोकूनच देतो. कारण गणपती हे महाराष्ट्राचं लाडकं दैवत! गणेशोत्सव म्हटलं की सामान्य मराठी माणसाचं मन आपल्या गावी घरच्या गणपतीकडेच ओढ घेत असतं. कारण तिथं असणारं उत्साहाचं, प्रसन्न वातावरण आणि अर्थातच चविष्ट प्रसादाच्या पदार्थांची रेलचेल. कोकणात जाण्यासाठी मिळेल ते वाहन गाठून गणेश चतुर्थीच्या आधीच चाकरमानी कोकणात मूळ गावी पोहोचलेले असतात. कोकणातल्या गणपतीचा थाट काय विचारता महाराजा! दिवाळीला लाजवील असा थाट कोकणात गणेशोत्सवाला असतो.

नैवेद्याच्या पदार्थांत अर्थातच मानाचं पान उकडीच्या मोदकांना! सुंदर सुबक 21 किंवा किमान 11 कळ्या काढलेले मोदक ही कोकणच्या सुगरणींच्या हातची अंगभूत कला. कोकणात काही घरी उकडीच्या मोदकांनाच काहीसा वेगळा आकार देऊन गणेशोत्सवात भंडारा केला जातो, त्यावर दिवा पेटवून आरती केली जाते. घरात जितके पुरुष सदस्य असतात, तितके भंडारे तयार केले जातात आणि ते भंडारे घरातील पुरुष सदस्यच खातात. या उकडीत मिरचीचा ठेचा, जिरं आणि कोथिंबीर घालून उकडलेल्या निवगऱयाही तोंडाला चव आणतात.

सिंधुदुर्ग आणि मालवण परिसरात गणेशोत्सवाच्या काळात करंजीच्या नैवेद्याला मानाचे स्थान आहे. शिल्लक राहिलेल्या उकडीचा आणखी एक चविष्ट पदार्थ म्हणजे उंडेऱयाची खीर. रसमलाईशी साम्य असणारी ही खीर गणपती विसर्जनादिवशी शक्यतो करतात. ‘भिरडी’ नावाचा पदार्थ ऐकलाय का तुम्ही? तांदळाची पिठी, गूळ, नारळ यांची उकड काढून मळून त्याच्या शेंगोळ्या करून त्या तळतात. शेंगोळ्या, पुरणाचे तळलेले मोदक कोकणात नैवेद्यात असतात. तसेच मोदकांसह 21 वेगवेगळ्या भाज्यांचा आणि पुऱयांचा नैवेद्य श्री गणेशाला दाखवतात. यात वालीची भाजी, भेंडी,  कोबी, बटाटा, सुरण, गवार, सुरण, मुळ्याचा पाला, करांदे, शेगलाची भाजी, फरसबी, कारलं, फ्लॉवर मटार, दोडका, लाल माठ, मेथी, नीरफणस, कच्ची केळी अशा भाज्यांसोबत कुर्डू, भारंगी, पेव, टाकळा अशा रानभाज्यांचा समावेशही असतो. काही घरी या सगळ्या भाज्या एकत्र शिजवून त्यात आमसूल, नारळ, आलं यांचं वाटप लावून ‘आंबाट’ नावाचा पदार्थही आवर्जून बनवतात. तसंच चूनभात अर्थात नारळीभात, काकडीचं धोंडस, भोपळ घारगे हे पदार्थसुद्धा कोकणात नैवेद्यात हजेरी लावतात.

गणेशोत्सवात कोकणातल्या दोन विशेष भाज्या – एक म्हणजे अळूच्या गाठींची भाजी आणि दुसरी म्हणजे गणेश चतुर्थीनंतर येणाऱया ऋषीपंचमीला केली जाणारी ऋषीची भाजी. या दिवशी बैलांच्या श्रमाचे काही खायचं नाही, अशी परंपरा असल्याने परसात उगवलेल्या रानभाज्या, पालेभाज्या, फळभाज्यांची ही चविष्ट भाजी बनवतात. यात माठ, अळू, मक्याचे कणीस, दोडका, घोसाळं, पडवळ, सुरण, रताळं, लाल भोपळा, अळकुडी, कच्चे केळे, भेंडी, अंबाडे अशा वेगवेगळ्या भाज्या उपलब्धतेनुसार वापरतात आणि बेसिक मसाले म्हणून मिरचीचा ठेचा, खडे मीठ आणि काही ठिकाणी नारळाचं वाटप लावतात. ही भाजी नुसती खायलाही चविष्टच.

तुम्ही दुसरं टोक गाठून विदर्भात गेलात तर घरगुती गणेशोत्सवाचे दिवस तुम्हाला वाढलेले दिसतील शक्यतो. दहा दिवस बहुतांश घरी गणपती बाप्पा असतात. इथं मुख्य मान तळणीच्या मोदकांचा आणि खिरापतीचा. खिरापत म्हणजे किसलेलं सुकं खोबरं आणि पिठी साखर  हा मुख्य प्रसाद. तळणीचे मोदकही पिठीचे म्हणजे जाडसर दळलेली कणीक थोडा रवा, तुपावर खमंग भाजून, गार करून त्यात तितकीच पिठी साखर मिसळतात आणि बारीक रवा भिजवून त्याची पारी करून मोदक करतात. हे मोदक खमंग तळले जातात. विदर्भात विसर्जनाच्या दिवशी गोपाळकाल्याचा दहीकाल्याचा नैवेद्यही गणेशाला असतो. शिवाय परतलेली वाटली डाळ, मोकळी डाळसुद्धा अनेक ठिकाणी प्रसादाला असते. खान्देशातसुद्धा हाच प्रसाद असतो.

मराठवाडय़ातला गणेशोत्सवातला खास प्रसाद म्हणजे ‘वळीव लाडू’. यांचं नाव जरी ‘वळीव लाडू’ असलं तरी ते लाडूसारखे दिसत नाहीत आणि गोडही नसतात हं!  कणीक आणि रवा मोहन घालून मीठ घालून घट्ट मळायचा आणि त्याला कडबोळे किंवा शेंगोळ्याचा आकार द्यायचा. तेलात मंद आचेवर तळले की, त्याला आतून सुंदर पुंगळी सुटते आणि ते खुसखुशीत होतात. यासोबतच मराठवाडय़ातसुद्धा बाप्पाला तळणीच्या सुक्या खोबऱयांच्या सारणाच्या मोदकांचा नैवेद्य असतो. तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात आलात तर इथं उकडीचे आणि तळणीचे असे दोन्ही प्रकारचे मोदक अनेक घरी नैवेद्याला दिसतील. तळणीच्या मोदकांत खास करून ओला नारळ आणि गूळ/ साखर घालून सारण करून, रवा-मैद्याची पारी करून तळणीचे मोदक करतात, तर काही ठिकाणी सुकं खोबरं, साखर, वेलचीपूड असेही सारण असते. तसेच काही भागांत कणकेचे उकडीचे मोदकसुद्धा करतात. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रात ‘पंचखाद्य’ हा गणेशाचा लाडका प्रसादही आवर्जून केला जातो. त्यात पाच ‘ख’पासून सुरू होणारे पदार्थ घेतले जातात. खोबरं, खसखस, खारीक, खजूर आणि खडीसाखर हे मिसळून हा सोपा आणि चविष्ट प्रसाद बनतो. तर बुद्धीची देवता असलेला गणपती बाप्पा आपल्यासाठी खूप सारा आनंद घेऊन येतो. कारण त्याच्यामुळे कुटुंबातील सदस्य एकत्र जमतात, गप्पागोष्टी करतात, दणदणीत स्वरांत आरत्या म्हणतात आणि चविष्ट नैवेद्याचा आस्वादही घेतात.

[email protected]

(लेखिका मुक्त पत्रकार व खाद्य व्यावसायिक आहेत.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तिहेरी हत्याकांडाचा तपास डिवायएसपींकडे, आरोपींना 8 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी तिहेरी हत्याकांडाचा तपास डिवायएसपींकडे, आरोपींना 8 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी
दुर्वास पाटील याने केलेल्या तिहेरी हत्याकांडचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईणकर यांच्याकडे सपुर्द करण्यात आला आहे.हत्याकांडातील चार आरोपीना ८...
पावसाळ्यात डेंग्यूपासून बचावासाठी काय करावं? जाणून घ्या तज्ञांचे मत….
न्या. चंद्रशेखर यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती पदाची घेतली शपथ
नगरपालिका निवडणुकांसाठी EVM ऐवजी मतपत्रिकेचा वापर करा, कर्नाटक मंत्रिमंडळाची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी
चुकीच्या पद्धतीने GST लागू केला, आता माफी मागण्याऐवजी गर्विष्ठपणे भेट दिल्याची जाहिरात करताय; आदित्य ठाकरे यांचा टोला
मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे अभिनेते आशिष वारंग यांचं निधन
SA Vs ENG – दक्षिण आफ्रिकेने 27 वर्षांनी इंग्लंडचं मैदान मारलं, फक्त 5 धावांनी केलं चितपट