अफगाणिस्तानात भीषण भूकंप, आतापर्यंत 622 जणांचा मृत्यू; दीड हजारहून अधिक लोक जखमी
अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतात रविवारी रात्री भीषण भूकंप झाला होता. यात आतापर्यंत 622 जणांचा मृत्यू झाला 1500 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानच्या गृह मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल मतीन कानी यांनी सोमवारी वृत्तसंस्था एएफपीला सांगितले की, रविवारी मध्यरात्री झालेल्या भूकंपात कुनार प्रांतात 610 लोकांचा मृत्यू झाला आणि 1,300 जखमी झाले, तसेच अनेक घरे उद्ध्वस्त झाली. तर नंगरहार प्रांतात 12 लोकांचा मृत्यू झाला आणि 255 जखमी झाले आहेत.”
भूकंप किती भीषण होता याचा अंदाज यावरून लावता येतो की प्रभावित भागात सर्वत्र ढिगाऱ्याचे साम्राज्य झाले आहे. तिथे आक्रोश सुरू आहे. अधिकार्यांनी सांगितले की मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, कारण बचाव पथकं मर्यादित संपर्क साधनांसह दुर्गम भागात पोहोचत आहेत. याआधी अफगाणिस्तान राष्ट्रीय रेडिओ आणि टीव्हीने पूर्व नंगरहार प्रांतात नऊ लोकांचा मृत्यू आणि 20 जण जखमी झाल्याची माहिती दिली होती.
संयुक्त राज्य भूवैज्ञानिक सर्वेक्षण (USGS) नुसार, भूकंपाची तीव्रता 6.0 रिश्टर स्केल इतकी नोंदली गेली. भूकंप एवढा तीव्र होता की त्याचे धक्के संपूर्ण पाकिस्तान आणि दिल्ली-एनसीआरपर्यंत जाणवले. धक्के जाणवताच लोकं आपल्या घराबाहेर पळाले. दिल्लीतील लोकांनी सांगितले की उशिरा रात्री भूकंपाचे तीव्र धक्के बसले. इमारती हलल्या आणि लोक बाहेर धावत सुटले.
भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानच्या जलालाबादपासून 27 किलोमीटर पूर्व-ईशान्येला, 8 किलोमीटर खोलीत होते. भारतीय वेळेनुसार भूकंपाचे धक्के रात्री 12.47 वाजता जाणवले. त्यानंतर सुमारे 20 मिनिटांनी पुन्हा एक धक्का जाणवला, ज्याची तीव्रता 4.5 मोजली गेली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List