पाऊलखुणा – वेगळेपण दर्शवणारी गणेशस्थाने
>> आशुतोष बापट
गणेशाची देवस्थाने पाहताना आडेवाटेच्या दैवतांना जरूर भेट द्यावी. सह्याद्रीच्या डोंगरांचे सान्निध्य, रमणीय वनसंपदा आणि निसर्गाची उधळण असलेल्या कोल्हापूर जिह्यातील इच्छापूर्ती गणेश आणि इंचनालचा गणेश ही वेगळेपण दर्शवणारी गणेशस्थाने, ज्यांचे दर्शन घ्यायलाच हवे.
महाराष्ट्राच्या दक्षिणेचा जिल्हा कोल्हापूर आणि त्या कोल्हापूरच्याही दक्षिणेला असलेले तालुके म्हणजे गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा. या तीनही तालुक्यांना निसर्गाने भरभरून दिलेले आहे. सह्याद्रीच्या डोंगरांचे सान्निध्य, रमणीय वनसंपदा आणि निसर्गाची उधळण असे सगळे यथास्थित प्रकरण आहे. या ठिकाणी आडवाटेवर फिरताना दोन सुंदर गणेशस्थाने बघावीत अशी आहेत. त्यांचे स्थान, त्यांच्याशी निगडित असलेल्या कथा आणि त्या ठिकाणाचे नैसर्गिक महत्त्व यासाठी ही दोन ठिकाणे मुद्दाम वाट वाकडी करून बघावीत.
इच्छापूर्ती गणेश- एरंडोल आजरा
कोल्हापूर जिह्यातला आजरा तालुका निसर्गसौंदर्याने नटलेला आणि बहरलेला आहे. हा सगळा प्रदेश खरं तर दुर्गम म्हणायला हवा. अतिशय रमणीय आणि गूढ असलेल्या ह्या आडवाटेवरच्या प्रदेशात एक गणेशस्थान आहे एरंडोल इथे. हे गणेशस्थानसुद्धा काहीसे गूढ म्हणावे लागेल. ही मूर्ती एरंडोल आजरा इथे पोखरकर महाराजांच्या आश्रमात असलेल्या अष्टकोनी मंदिरामध्ये स्थापित केलेली आहे. आश्रमात एक विठ्ठल-रखुमाईचे मंदिर आणि जाबाली ऋषींची समाधीसुद्धा आहे. भक्तांनी केलेल्या आर्थिक मदतीमधून हे मंदिर बांधलेले आहे. या मंदिराला तळघर असून ध्यानधारणेसाठी तिथे बसता येते. अष्टविनायकांच्या प्रतिमा आठ दिशांना या मंदिरात ठेवलेल्या आढळतात. गर्भगृहात सोळा हात असलेली, उजव्या सोंडेची, पंचधातूची ही मूर्ती उभ्या स्थितीतली आहे. मूर्तीचे सोवळे अत्यंत कडक असून पुजारी सोडून कोणालाही गर्भगृहात प्रवेश करता येत नाही. ही मूर्ती इथे कशी आली याबद्दल एक चमत्कारिक कथा प्रसिद्ध आहे. तांत्रिक साधना करणाऱया लोकांच्या वापरातली ही मूर्ती होती. चंबळ इथल्या एका ऋषींच्या जवळ असलेली ही मूर्ती चंबळ-उज्जैन-तंजावर-गोकाक असा प्रवास करत शेवटी संकेश्वर इथल्या रघुनाथशास्त्राr नामक महात्म्याकडे आली. रघुनाथ शास्त्राr आजारी पडल्यावर ही मूर्ती एरंडोल आजरा इथले संत तुळशीराम महाराज पोखरकर यांना द्यावी असा त्यांना स्वप्नदृष्टांत झाला. त्यायोगे ही मूर्ती एरंडोल इथे येऊन पोहोचली. मूर्तीचे तेज आणि तिची शक्ती सहन न झाल्याने तिचा सुरुवातीला पोखरकर महाराजांना बराच त्रास झाला. परंतु त्यांचे गुरु काशी येथील आत्मप्रकाशानंद यांनी स्वामींना आश्वस्त केले आणि त्याचा त्रास बंद झाला. पुढे पोखरकर महाराजांच्या आश्रमातच हे मंदिर बांधून तिथे मूर्ती ठेवलेली आहे. या ठिकाणी प्रसाद म्हणून नारळ फोडला जात नाही तर गूळखोबरे आणि शेंगदाण्याचे लाडू देवापुढे ठेवले जातात. अनेक भाविकांची इच्छा पूर्ण करणारा म्हणून याला इच्छापूर्ती गणेश म्हणतात, तर साधकांना मदत करणारा म्हणून याला मोक्षदाता गणेश असेही नाव आहे. दर संकष्टीला कर्नाटक, गोवा आणि पश्चिम महाराष्ट्रातले अनेक भाविक दर्शनासाठी इथे येतात.
इंचनालचा गणेश
कोल्हापूर जिह्यातला गडहिंग्लज हा तालुका म्हणजे अनेक निसर्गरम्य ठिकाणे, किल्ले, मंदिरे यांची रेलचेल असलेला प्रदेश आहे. खरं तर हा काहीसा दुर्लक्षित भाग म्हणावा लागेल. पर्यटनाच्या दृष्टीने खूप समृद्ध असूनही या प्रदेशांबद्दल फारशी माहिती लोकांना नसते. भौगोलिकदृष्टय़ा सुद्धा हा प्रदेश काहीसा वेगळा पडल्यासारखाच आहे. आंबोलीसारखे प्रसिद्ध गिरीस्थान इथून जवळ आहे. गर्द झाडी, सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि चंदगड, आजरा यासारखे निसर्गसंपन्न तालुके यांचा शेजार लाभलेला हा भाग. गडहिंग्लजच्या पश्चिमेला फक्त 7 कि.मी. अंतरावर इंचनाल नावाचे टुमदार गाव आहे. निसर्गाचे सान्निध्य लाभलेल्या या गावात हिरण्यकेशी नदीच्या काठावर एक जुनी गावची पांढर या ठिकाणी गणेशाचे एक सुंदर मंदिर उभे आहे. या मंदिराला बराच इतिहास लाभलेला आहे. इ.स. 1907-08 साली या पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार श्री. गोपाळ आप्पाजी कुलकर्णी यांनी केल्याची नोंद आहे. त्यानंतर श्री गजानन ग्रामस्थ सेवा मंडळ, इंचनाळ, मुंबई आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी मिळून 1987 ते 1992 या काळात पुन्हा एकदा हे मंदिर नव्याने बांधून काढले. त्यासाठी गोकाकवरून आरभाव जातीचा दगड वापरला गेला आहे. करवीर पीठाच्या शंकराचार्यांच्या हस्ते 4 मे 1992 रोजी मंदिराचा कलशारोहण समारंभ झाला. मोठा प्रशस्त सभामंडप, बाजूला बगिचा, महादेव मंदिर असा सर्व रम्य परिसर आहे हा. इंचनालच्या या मंदिरातील गणेशमूर्ती बैठी असून तिची उंची अंदाजे सवा दोन फूट एवढी आहे. काळ्या पाषाणातली ही मूर्ती शांत आणि मोठी प्रसन्न दिसते. चतुर्भुज गणेशाच्या हातात पाश, अंकुश, पात्र असून एक हात वरद मुद्रेत आहे. या मंदिराची देखभाल देवस्थान समितीकडे आहे. देवाच्या नावानी जवळ जवळ 9 एकर बागायती जमीन आहे. माघ महिन्यामध्ये येणाऱया गणेश जयंतीला इथे मोठा उत्सव करतात आणि महाप्रसादाचे आयोजन केलेले असते. कोल्हापूर, सावंतवाडी, गोवा, बेळगाव इथून भाविक यावेळी इथे दर्शनाला येतात. अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारे अशी ख्याती असलेले हे देवस्थान आहे. महागावचे दंडगे (जोशी) घराण्याकडे गेल्या 300 वर्षांपासून या गणपतीच्या पूजेची व्यवस्था दिलेली आहे. कोल्हापूर-गडहिंग्लज येण्यासाठी बस सेवा विपुल आहे. मुद्दाम वाट वाकडी करून पर्यटकांनी हा सगळाच परिसर फिरून पाहण्याजोगा आहे.
[email protected]
(लेखक }ाsकसंस्वॅढतीचे अभ्यासक आहेत)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List