50 हून कमी क्षेपणास्त्रातच पाकिस्तानने गुडघे टेकले, एअर मार्शल नर्मदेश्वर तिवारी यांचा दावा
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी तब्बल 26 पर्यटकांना गोळ्या घालून माताभगिनींचे कुंकू पुसले. त्यानंतर हिंदुस्थानच्या हवाई दलाने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त केले. हिंदुस्थानने 50 हून कमी क्षेपणास्त्रs डागली, तरीही पाकिस्तानने काही दिवसांतच अक्षरशः गुडघे टेकले आणि युद्धबंदीसाठी विनवणी केली, असा दावा व्हाईस चीफ ऑफ एअर स्टाफ मार्शल नर्मदेश्वर तिवारी यांनी केला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सातत्याने त्यांनी मध्यस्थी केल्याने आणि व्यापार तोडण्याची धमकी दिल्यामुळे हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी झाली. आपण मोठे अणुयुद्ध रोखले, असा दावा सातत्याने केला आहे. त्यानंतर हिंदुस्थानकडूनही पाकिस्ताननेच आधी गुडघे टेकले आणि युद्धबंदी करण्यात आली, असा दावा सातत्याने करण्यात येत आहे. परराष्ट्र मंत्री, परराष्ट्र सचिव तसेच लष्करी अधिकाऱ्यांकडून ट्रम्प यांच्या दाव्याचे खंडन केले जात आहे. आता हवाई दलाच्या व्हाईस चीफ ऑफ एअर स्टाफ मार्शल यांनी ट्रम्प यांचा दावा खोडून काढत दोन्ही देशांतील संघर्ष नेमका कसा थांबला याबद्दल सांगितले आहे.
युद्ध सुरू करणे सोपे, पण संपवणे कठीण
युद्ध सुरू करणे सोपे असते, मात्र युद्ध संपवणे अतिशय कठीण असते, असेही एअर मार्शल नर्मदेश्वर तिवारी म्हणाले. तिन्ही दलाच्या जवानांना आणि अधिकाऱ्यांना प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार करण्यात आले. शत्रूविरोधात सर्व प्रकारची कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. जेणेकरून भविष्यात पाकिस्तानकडून दहशतवाद्यांच्या आडून हिंदुस्थानवर हल्ला करताना अनेकदा विचार करावा लागेल. तसेच तिन्ही दलांना पूर्ण मोकळीक देण्यात आली. या संघर्षाची परिणती पारंपरिक युद्धात होऊ नये यासाठीही खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या, असेही ते म्हणाले.
आयएसीसीएस यंत्रणेने हल्ले रोखले
चार दिवस दोन्ही बाजूंनी क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले सुरू होते. परंतु, हिंदुस्थानी लष्कराने, हवाई दलाने आणि नौदलाने पाकिस्तानची अक्षरशः कंबर मोडली. हवाई दलाने 10 मे रोजी पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त केले. ब्राह्मोससारखी क्षेपणास्त्रsही डागण्यात आली. त्यानंतर सायंकाळी पाकिस्तानने युद्धबंदीसाठी विनवणी केली आणि हिंदुस्थानने त्यासाठी मंजुरी दिली, असे नर्मदेश्वर तिवारी यांनी सांगितले. हिंदुस्थानची आयएसीसीएस म्हणजेच इंटीग्रेटेड एअर कमांड आणि कंट्रोल सिस्टमने पाकिस्तानचे हल्ले रोखले. आक्रमकता आणि संरक्षण अशी दुहेरी भूमिका या यंत्रणेने बजावली, असेही ते म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List