बिहारची ‘मतदार अधिकार यात्रा’ देशव्यापी चळवळ बनणार, आरा येथे राहुल गांधी यांनी व्यक्त केला विश्वास
दलित, अल्पसंख्याक आणि महिलांना मत देण्याचा अधिकार आहे, असे सांगतानाच बिहारची ‘मतदार अधिकार यात्रा’ देशव्यापी चळवळ बनेल, असा विश्वास लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी व्यक्त केला. मतदार अधिकार यात्रा आज बिहारमधील आरा येथे पोहोचली.
भोजपूर येथील काँग्रेसच्या जिल्हा मुख्यालयात सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारच्या बिहारमध्ये राबवण्यात येत असलेल्या मतदार याद्यांच्या फेरतपासणी मोहिमेवर जोरदार टीका केली. ही मोहीम म्हणजेच राज्यघटना आणि देशाच्या लोकशाहीवर घाला असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला. बिहारपासून सुरू करण्यात आलेली ‘मतदार अधिकार यात्रा’ ही चळवळ देशभरात जाईल आणि मतचोरीविरोधात आवाज उठवेल, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले. भाजपा, आरएसएस आणि निवडणूक आयोग संगनमत करून मतांची चोरी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
महाराष्ट्र, हरयाणाप्रमाणे बिहारमध्ये मतचोरी होऊ देणार नाही
महाराष्ट्र, हरयाणासह विविध राज्यांमध्ये मतचोरी करण्यात एनडीएचे सरकार यशस्वी ठरले. परंतु, बिहारमध्ये भाजपा आणि निवडणूक आयोगाला कुठल्याही परिस्थितीत मतांची चोरी करू देणार नाही, असा निर्धार राहुल गांधी यांनी यावेळी बोलून दाखवला. दरम्यान, बिहारमधील मतदार अधिकार यात्रेचा समारोप पाटणा येथे होणार आहे.
ओरिजिनल की डुप्लिकेट सीएम पाहिजे, निर्णय तुमचा – तेजस्वी यादव
मुले ज्याप्रकारे कागदाची विमाने उडवतात त्याप्रमाणेच मुख्यमंत्री नितीश कुमार यांची आश्वासने आहेत. त्यामुळे तुम्हाला ओरिजिनल मुख्यमंत्री पाहिजे की डुप्लिकेट, शेवटी निर्णय तुमचा आहे, असे राजद नेते तेजस्वी यादव म्हणाले. यापूर्वीही भाजपचा रथ इथेच रोखला होता, हे बिहारमधील लोकांना माहीत असेल. यावेळीही त्यांचा रथ बिहारची जनताच रोखणार, असा विश्वासही तेजस्वी यादव यांनी व्यक्त केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List