परीक्षण – नादमय काव्य आविष्कार 

परीक्षण – नादमय काव्य आविष्कार 

>> आबा पाटील

पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कन्या ममता सिंधुताई सपकाळ यांनी सुरू केलेल्या ‘माई’ प्रकाशनाचं प्रकाशन क्षेत्रातील पहिलं पाऊल आणि महानंदा मोहिते यांचा पहिला कवितासंग्रह ’घुंगुरमाळा’ अशा सुंदर गोष्टींचा मिलाफ या पुस्तकाच्या निमित्ताने होत आहे. कवितासंग्रहातील भावभांडाराला साजेल असे विजय टिपुगडे यांनी मुखपृष्ठावरील चित्र रेखले आहे तर डॉ. महेश केळुसकर यानी पाठराखण केली आहे.

’घुंगुरमाळा’ हा कवितासंग्रह अभिजन काव्य प्रकाराशी नाते जोडणारा असला तरी अभिव्यक्तीच्या आधुनिक प्रवाहापासून फारकत घेणारा नाही. छंद, लय, नाद वृत्त, मात्रा, यती या तांत्रिक बाजू भक्कमपणे सांभाळून मुक्तछंदासोबत साचेबद्ध गझल प्रकार हाताळण्याची सचोटी कवयित्रीकडे असल्याचे सबळ पुरावे संग्रहात जागोजागी सापडतात.

कवितेसोबत वाचकाला कवयित्रीचं जगणंही वाचता आलं पाहिजे. या कवितासंग्रहात कवयित्रीचं एकूण भावविश्वच अनुभवायला मिळतं. कवयित्रीचं गावखेडय़ातील बालपण, गावाकडच्या श्रद्धा-अंधश्रद्धा, परंपरा, चालीरिती, शेतीमाती, लोप पावू लागलेली लोकभाषा आणि तिचे शब्दसौंदर्य हे सगळं लोकगीताच्या लयीपासून ते अभंगांच्या अथांगतेपर्यंत आणि छंदांच्या फंदात न पडणाऱ्या मुक्तछंदापर्यंत सगळ्याच प्रकारात मांडलंय हे वैशिष्टय़. कवितासंग्रहात विभागवारी नसली तरी वाचक सहज विभागणी करू शकतील दोन प्रकारच्या कवितांचा संग्रहात आविष्कार जाणवतो. एक म्हणजे कृषी सण संस्कृतीशी निगडीत ग्रामीण कविता आणि दुसरा मानवी भावभावनांच्या सकल नोंद घेणाऱ्या कविता.

संग्रहात ग्रामीण जीवनशैली आणि कृषीजाणिवांचा वेध घेणाऱ्या या कविता सहज सरळ एकमार्गी गावाकडच्या माणसांसारख्या भोळ्या भाबडय़ा, लोकलयीतल्या आणि लोकबोलीतल्या आहेत. जसे की –

कसदार काळी माती, तिची लेकरे हिरवी

तरारल्या पात्यामध्ये, विठू झोकात मिरवी

ग्रामीण कविता लिहीत असल्याचं ओझं खाली उतरून कवयित्री शिवाराची हिरवाई गडद करते. गावाकडची लगीनघाईचं चलचित्र वाचकांच्या डोळ्यासमोर हुबेहूब उभं करण्याचं सामर्थ्य या कवितांमध्ये आहे. ’सुगी’ ही कविता सुगीतल्या कामाची झुंबड अधोरेखित करते. ’सबूद’सारखी कविता तर ग्रामीण कवितेचा नमुना आहे. वाचताना लोकबोलीचे हेल वाचकांच्या ओठातून बाहेर पडावेत अशी जादुगरीन.

हाय वंगाळ दांडगी, बाई वाऱ्याची गं खोड

सादवीत हिंडतोया, कसं धरू त्येचं तोंड

भाषेची आाढस्ताळी प्रमाणबद्धता नाकारून बोलीतल्या विस्मृतीत जाऊ घातलेल्या शब्दांचा जाणीवपूर्वक पुनरुच्चार महानंदांच्या कवितेनं केला आहे. उदा. ढासं वारं, तट्टय़ा, कणगी, सादवणे, बेजमी, पिंजर अशा कितीतरी भाषेपासून तुटत गेलेल्या शब्दांशी कवितेने नव्याने नाते जोडले आहे.

’घुंगुरमाळा’ या कवितासंग्रहातील दुसरा विभाग हा अभिजात काव्यसौंदर्याची ओळख पटवून देणारा, प्रतिमा आणि प्रतिकांनी परिपूर्ण. कवयित्रीच्या प्रतिभेची उंची निश्चित करणारा.

गंधवतीच्या गर्भामधुनी, तगमणारा गंध नवा

मनासारखे फुलण्याआधी, हृदयावरती दंश हवा..

वरील कवितेला अनुसरून कवयित्रीच्या अंत:स्थावर प्रतिभेने दंश केला आहे म्हणून तर तिचा अंतस्थ शब्द होऊन भळभळतो आहे.

कविता फक्त वाचकांचे डोळेच वाचत नसतात. तर त्यांच्या अव्यक्त जाणिवाही कविता वाचत असतात. अशा अव्यक्त जाणिवांची भूक शमली नाही तर प्रतितयश प्रतिभावंताचीही कविता फसते. महानंदा मोहिते यांच्या कवितेत वरील सर्व घटकांचा समावेश आढळतो. तसेच दिवसांच्या प्रहरांचा चपखल उपयोग निर्मितीत सर्रास विखुरलेला दिसतो.

भावनांचे संकलन प्रवाह संग्रहात येताना ’घुंगुरमाळा’ ही समग्र कविता नव्या जुन्या जाणिवेची आहे. तिचं निसर्गाशी नातं आणि आपण निसर्गाचा घटक होताना कवितेचा काळ स्थिर होत नाही. म्हणून ही कविता कधीही वाचताना क्षणांना अनुसरून आपलीशी वाटणारी आहे. इथं कवयित्रीच्या कवित्वाचं प्रयोजन सुस्पष्ट आहे.

लिहावयाचे इतके सुंदर, मिटून जावे अंतर

कोणी लिहिले कोणासाठी, पाहवयाचे नंतर…

घुंगुरमाळा 

 कवयित्री : महानंदा मोहिते 

प्रकाशन : माई पब्लिकेशन्स   किंमत : 200 रु

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आरव, प्रेक्षा, वेदांत, ध्रुव, प्रसादचे विजय आरव, प्रेक्षा, वेदांत, ध्रुव, प्रसादचे विजय
श्रीकांत स्पोर्ट्स क्लब व सार्वजनिक गणेशोत्सव-कांदिवलीतर्फे आयोजित श्रीकांत चषक शालेय कॅरम स्पर्धेत आरव सावंत, प्रेक्षा जैन, वेदांत राणे, ध्रुव शहा,...
तुमच्या आहारात ‘या’ पेयांचे समावेश केल्यास कर्करोगापसून मिळेल सुटका….
ऑस्ट्रेलियात हिंदुस्थानींसह स्थलांतरितांविरुद्ध प्रदर्शनं, काय आहे कारण? वाचा…
उकडलेले मशरूम आणि अंड्यांपासून बनवा ही खास रेसिपी, या टिप्स फॉलो करा
कच्चं गाजर खाणं आवडत नाही? मग अशाप्रकारे तयार करा त्याचं सूप
पोटाची चरबी वाढण्याचे मुख्य कारण तुम्हाला माहिती आहे का?
नैराश्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो का?