सावली बारवरील कारवाईचा तपशील तातडीने द्या, नाहीतर कोर्टात जाईन! अनिल परब यांची कांदिवली समतानगर पोलिसांकडे मागणी
गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे असलेल्या सावली बारवर पोलिसांनी धाड घालून बारबाला आणि गिऱहाईकांना अटक केली होती. त्याप्रकरणी शिवसेना नेते, आमदार अॅड. अनिल परब यांनी आज कांदिवली समतानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱयांची भेट घेतली. सावली बारप्रकरणी आतापर्यंत झालेल्या तपासाचा तपशील तातडीने द्या अन्यथा न्यायालयात जाईन, असा इशारा यावेळी अनिल परब यांनी दिला.
सावली बारवर धाड टाकल्यानंतर दोन महिने उलटले तरी बारच्या परवानाधारकावर कारवाई का केली नाही, बारचा परवाना गृह राज्यमंत्र्यांच्या आईच्या नावे असल्याने कारवाई केली जात नाही का, याबाबत आपल्याला लेखी माहिती मिळावी, अशी मागणी यावेळी अनिल परब यांनी पोलिसांकडे केली. बारवर धाड घातली गेली त्यावेळचे व्हिडीओ फुटेज मिळावेत, अशीही मागणीही त्यांनी कांदिवली समतानगर पोलिसांकडे केली.
‘महाराष्ट्रात डान्स बारवर बंदी आहे. असंख्य कुटुंबे डान्स बारमुळे देशोधडीला लागली आहेत. तरुणांना देशोधडीला लावण्याचे काम डान्स बारनी केले आहे. दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी डान्स बारवर बंदी घातली होती. त्यानंतरही विद्यमान गृह राज्यमंत्र्यांच्या घरातल्या व्यक्तीच्या नावे आज डान्स बार चालतो ही शरमेची बाब आहे,’ असे अनिल परब म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List