माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी अखेर शासकीय बंगला सोडला; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला लिहिले होते पत्र
देशाचे माजी सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी अखेर शासकीय बंगल्यातील आपला मुक्काम दुसरीकडे हलवला आहे. सेवानिवृत्त होऊन काही महिने उलटले तरी ते शासकीय बंगल्यातच तळ ठोकून होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने आक्षेप घेतला आणि बंगल्याची जागा रिकामी करुन देण्यासाठी केंद्र सरकारला पत्र लिहिले होते.
चंद्रचूड हे 10 नोव्हेंबर 2024 रोजी सरन्यायाधीश पदावरुन निवृत्त झाले. 2022 च्या नियमावलीनुसार सरन्यायाधीशांच्या खास बंगल्यात निवृत्तीनंतर आणखी सहा महिने राहण्यास मुभा असते. त्यानुसार चंद्रचूड यांची मुदत 10 मे 2025 रोजी संपुष्टात आली. मात्र त्यांनी त्या मुदतीत बंगला रिकामी करुन दिला नाही. त्यामुळे नंतर सरन्यायाधीश बनलेल्या न्यायमूर्ती संजीव खन्ना व न्यायमूर्ती भूषण गवई यांना आधीच्याच बंगल्यात राहावे लागले. याकडे सर्वोच्च न्यायालय प्रशासनाने केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते.
त्यानंतर चंद्रचूड यांनी पर्यायी घरामध्ये जाण्यासाठी हालचालींना गती दिली होती. त्यांनी मुलींच्या वैद्यकीय अडचणींचे कारण दिले होते. दुर्धर आजाराने त्रस्त मुलींसाठी चांगली व्यवस्था करण्यात वेळ लागत असल्याने लगेच शासकीय बंगला खाली करु न शकल्याचे ते म्हणाले होते. मात्र आता त्यांनी बंगला खाली करुन दिला आहे. याबाबत त्यांनी प्रतिक्रियादेखील दिली आहे. ‘मी आणि माझी पत्नी कल्पना गेल्या एका आठवड्यापासून घरातील सर्व सामान शिफ्ट करीत आहोत, आता आम्ही 5, कृष्णा मेनन मार्गावरून बाहेर पडलो आहोत’, असे माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List