Photo – ‘गण गण गणात बोते’च्या गजरात श्रींच्या पालखीचे शेगावात भव्य स्वागत!
श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरपूर ते शेगाव पायदळ वारीनंतर 31 जुलै रोजी संतनगरी शेगावात भाविकांच्या जयघोषात भव्य स्वागत झाले. 2 लाखांहून अधिक भाविकांच्या साक्षीने भक्तिमय वातावरणात हा ऐतिहासिक सोहळा उत्साहात पार पडला.
पंढरपूरहून पायदळ वारी करत आलेली श्री संत गजानन महाराजांची पालखी सकाळी 12 वाजता शेगाव नगरीत दाखल झाली. तब्बल 1300 किमी अंतर पार करून आणि दोन महिन्यांच्या प्रवासानंतर श्रींची पालखी गण गण गणात बोते, टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि जय गजाननच्या घोषात शहरात पोहोचली.
खामगाव ते शेगाव या 17 किमीच्या पायी वारीत दोन लाखांहून अधिक भाविक सहभागी झाले होते. वाटचालीदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा रांगोळ्यांची सजावट, सेवा केंद्रे आणि भक्तांनी केलेले मनोभावे स्वागत पाहायला मिळाले. सकाळी 5 वाजता खामगाव येथून प्रस्थान झालेली पालखी, वाटिका येथे थांबल्यानंतर दुपारी 1.30 वाजता नगर परिक्रमेसाठी रवाना झाली.
शहरातील विविध चौकांमध्ये प्रशासन, संस्थान, शासकीय कार्यालये, सेवाभावी संस्था आणि नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले. शेवटी सायंकाळी 6 वाजता श्रींची पालखी मंदिरात पोहोचली. भजन, अभंग, जयघोष आणि महाआरतीसह ५६व्या पंढरपूर पायी वारी सोहळ्याची सांगता करण्यात आली.
या प्रसंगी साधारणतः 90 हजार भाविकांनी श्रींचा महाप्रसाद घेतला तर समाधी व श्रीमुख दर्शनासाठी हजारोंनी रांगा लावल्या. पोलिस प्रशासनाने संपूर्ण सोहळ्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. खामगाव-शेगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. शिस्तबद्ध वारकरी, सेवाभावी संस्थांचे योगदान आणि लाखो भाविकांच्या सहभागामुळे यंदाचा श्रींचा पालखी सोहळा संस्मरणीय ठरला. शेगाव नगरीला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते आणि वातावरणात ‘जय गजानन’, ‘विठ्ठल विठ्ठल’ चा अखंड गजर घुमत होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List