दिल्लीतील 3 शाळांना बाॅम्बने उडवण्याची धमकी, बाॅम्ब शोध पथकाचा तपास सुरु
दिल्लीतील शाळांना मोठ्या प्रमाणावर बाॅम्बने उडवून देण्याचे मेल येताहेत. आज (18 जुलै) एकूण 3 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. प्रथम रोहिणी सेक्टर 3 मधील अभिनव पब्लिक स्कूल, पश्चिम विहारमधील रिच मोंड स्कूल आणि नंतर रोहिणी सेक्टर 24 मधील सॉवरेन स्कूलला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा मेल आला आहे. अग्निशमन दल आणि दिल्ली पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. बॉम्ब शोध पथकही तपास करत आहे.
बुधवारी (16 जुलै) सकाळी दक्षिण दिल्लीतील वसंत व्हॅली स्कूल आणि द्वारका येथील सेंट थॉमस स्कूलला ईमेलद्वारे धमकीचे संदेश आले. दिल्लीतील एकूण नऊ शाळांना सलग तीन दिवसांत 10 बॉम्बने उडवण्याच्या धमकीचे ईमेल मिळाले आहेत.
या वर्षी 7 फेब्रुवारी रोजी पूर्व दिल्लीतील मयूर विहार फेज-1 मधील अल्कॉन पब्लिक स्कूलला बॉम्ब धोक्याची धमकी मिळाली होती. सखोल शोध घेतल्यानंतर काहीही संशयास्पद न आढळल्याने अधिकाऱ्यांनी ती केवळ अफवा असल्याचे घोषित केले. गेल्या सलग तीन दिवसांपासून दिल्लीच्या शाळा आणि महाविद्यालयांना बॉम्ब धोक्याच्या धमक्या मिळत असल्याने पोलिसांच्या अडचणी खूप वाढल्या आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, हे धमकीचे ईमेल ‘एनक्रिप्टेड नेटवर्क’ द्वारे पाठवले गेले आहेत. त्यामुळेच या ईमेलच्या मूळापर्यंत जाणे कठीण झाले आहे. दिल्ली पोलिसांचे सायबर तज्ञ आणि धमक्या तपास करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की धमक्या पाठवणारे ‘व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क’ (व्हीपीएन) आणि ‘डार्क वेब’ वापरत आहेत. ‘डार्क वेब’ हे सहसा गुगल, बिंग सारख्या सर्च इंजिनवरून दिसत नाही आणि ते फक्त विशेष सॉफ्टवेअरद्वारेच अॅक्सेस करणे शक्य आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List