ट्रम्प यांची स्वप्नपूर्ती! व्हाईट हाऊसमध्ये साकारणार 1800 कोटींचा भव्यदिव्य बॉलरूम
व्हाईट हाऊसमध्ये आता लवकरच एक भव्य बॉलरूम बांधला जाणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अनेक वर्षांचे स्वप्न होते. सुमारे 200 दशलक्ष डॉलर्स खर्चून बांधल्या जाणाऱ्या या हॉलचे बांधकाम सप्टेंबरपासून सुरू होईल. ट्रम्प आणि काही खाजगी देणगीदारांकडून याकरता निधी देण्यात येणार आहे.
1800 कोटींचा खर्च असलेल्या या बाॅलरुमच्या बांधकामाची अधिकृत घोषणा गुरुवारी व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी केली. ट्रम्पसाठी या बॉलरूमची कल्पना नवीन नाही. 2016 मध्ये ट्रम्प अध्यक्षीय निवडणुकीसाठी प्रचार करत होते. त्यावेळी बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होते. तेव्हा ट्रम्प यांनी त्यांच्या वैयक्तिक पैशातून व्हाईट हाऊससाठी 100 दशलक्ष डॉलर्सचा नवीन बॉलरूम बांधण्याची ऑफर दिली होती. परंतु ओबामा प्रशासनाने हा प्रस्ताव गांभीर्याने घेतला नाही. पण आता आठ वर्षांनंतर तोच प्रस्ताव प्रत्यक्षात येणार आहे.
नवीन बॉलरूम व्हाईट हाऊसच्या ईस्ट विंगजवळ बांधण्यात येणार आहे. सध्या याठिकाणी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प आणि इतर काही महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांची कार्यालये सध्या आहेत. प्रेस सेक्रेटरी लेविट यांच्या मते, हा बॉलरूम सुमारे 90 हजार चौरस फूट क्षेत्रात बांधला जाईल. याची 650 आसनक्षमता असणार आहे. सध्या व्हाईट हाऊसच्या ईस्ट रूममध्ये औपचारिक कार्यक्रम आयोजित केले जातात. याची बसण्याची क्षमता केवळ 200 जणांसाठी आहे.
या प्रकल्पासाठी संपूर्ण रक्कम खाजगी देणग्यांमधून येईल. यात ट्रम्प यांचे योगदान सर्वात महत्त्वाचे असणार आहे. इतर देणगीदारांची नावे अद्याप सार्वजनिक केलेली नाहीत. बॉलरूमचे बांधकाम सप्टेंबर 2025 मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. हा बॉलरूम 2029 मध्ये ट्रम्प यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी पूर्ण होईल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List