एअर इंडियाच्या विमानाला 11 तासांचा विलंब; दिल्लीला येणारे प्रवासी लंडनमध्ये खोळंबले
एअर इंडियाच्या विमान सेवेला लागलेले ग्रहण कायम आहे. कंपनीच्या विमानांना कधी विलंब, तर कधी तांत्रिक बिघाड याचा मनस्ताप विमान प्रवाशांना सहन करावा लागत आहे. शुक्रवारी लंडनहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला तब्बल 11 तासांपेक्षा जास्त विलंब झाला. हे विमान आता शनिवारी सकाळी दिल्लीच्या दिशेने हवेत झेपावणार आहे. त्यामुळे प्रवाशांना शुक्रवारची रात्र लंडन विमानतळावरच थांबावे लागणार आहे.
शुक्रवारी एअर इंडियाचे विमान लंडन हीथ्रोहून दिल्लीला टेक ऑफ घेणार होते. मात्र AI2018 हे विमान उशिराने पोहोचले होते. त्यामुळे टेक ऑफची वेळ बदलण्यात आली. त्यानुसार आता ते विमान 2 ऑगस्ट रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी 8 वाजता दिल्लीच्या दिशेने टेक ऑफ घेणार आहे. लंडन विमानतळावर रात्रीच्या कर्फ्यूमुळे कामकाजावर बंधने आल्याचे एअर इंडियाने निवेदनात म्हटले आहे.
प्रवाशांनी तिकिटे रद्द केल्यास किंवा त्यांचे वेळापत्रक बदलल्यास पूर्ण परतफेड करण्याचा पर्याय देण्यात आल्याचे एअर इंडियाने स्पष्ट केले. यापूर्वी गुरुवारी तांत्रिक समस्येमुळे लंडनला जाणाऱ्या ड्रीमलाइनरने दिल्ली विमानतळावर टेकऑफ रद्द केले होते. त्यावेळी पर्यायी ड्रीमलाइनरने लंडनला जाण्यासाठी उड्डाण केले होते. एअर इंडियाच्या विमानांमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड निर्माण होत असल्याने त्याचा प्रवासी सेवेवर मोठा परिणाम जाणवत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List