Crime news – मुलगा शिकवणीला गेला, तो परतलाच नाही; प्रोफेसर वडिलांचा फोन खणाणला अन्…
बंगळुरूमध्ये दिवसाढवळ्या शाळकरी मुलाचे अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. निश्चिथ (वय – 13) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह बंगळुरूतील बैनरघट्टा भागातील कग्गलिपुरा रस्त्यावर सापडला. यानंतर एकच खळबळ उडाली.
निश्चिथ हा एका खासगी कॉलेजच्या प्रोफेसरचा मुलगा होता. 30 जुलैला सायंकाळी पाचच्या सुमारास शिकवणीसाठी घराबाहेर पडलेला निश्चित माघारी आलाच नाही. कुटुंबियांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र त्याचा थांगपत्ता लागला नाही. यानंतर रात्री कुटुंबियांनी हुलीमावू पोलीस स्थानकामध्ये निश्चिथ बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला. हुलीमावू पोलीस स्थानकाचे अधिकारी कुमारस्वामी आणि पीएसआय अरविंद कुमार यांच्या नेतृत्वात पोलिसांनी रात्रभर शोधमोहीम राबवली. याच दरम्यान बैनरघट्टा जंगल परिसरामध्ये एक जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला. पोलीस चौकशीमध्ये हा मृतदेह बेपत्ता निश्चिथचा असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी वेगवेगळी पथके रवाना केली.
आरोपी बैनरघट्टा जंगल भागात लपल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. यावेळी झालेल्या चकमकीमध्ये दोन मुख्य आरोपी जखमी झाले असून त्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दोन्ही आरोपींच्या पायात गोळी घुसली असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरूमूर्ती आणि गोपालकृष्णा अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
वडिलांचं निधन, आई प्रियकरासोबत फरार; पोरक्या झालेल्या मुलाची पोलिसात धाव, म्हणाला, ‘ते मला…
मुख्य आरोपी गुरूमूर्ती पीडित कुटुंबाच्या घरी ड्रायव्हरचे काम करत होता. त्याला कुटुंबाबद्दल इत्यंभूत माहिती होती. त्याने सहकाऱ्याच्या मदतीने मुलाचे अपहरण करण्याचे षडयंत्र रचले. आधी मुलाची हत्या केली आणि नंतर पाच लाखांच्या खंडणीसाठी वडिलांना फोन केला, असे पोलीस चौकशीमध्ये उघड झाले आहे. तसेच गुरूमूर्तीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचेही समोर आले असून त्याने ही हत्या का केली याचा पोलीस तपास करत आहे. तसेच या हत्याकांडात सहभागी अन्य आरोपींचाही शोध सुरू आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List