Ratnagiri News – प्री-पेड विद्युत मीटर सक्ती विरोधात दापोलीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा एल्गार
प्री-पेड विदयुत मीटर बसविण्याचा ठेका घेतलेल्या कंपन्या घराघरांत जावून जबरदस्तीने, दमदाटी करून इतकेच नव्हे तर जी घरे बंद आहेत अशा घरात विनापरवाना विद्युत मीटर बसवित आहेत. त्यामुळे दापोली तालुक्यात असंतोषाचे वातावरण पसरले असून याचा कधीही भडका उडू शकतो अशी स्पष्ट कल्पना व ईशारा देत महाविकास आघाडीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधिकार्यांना धारेवर धरले.
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस पार्टी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे दापोली तालुका शिवसेना तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर, काँग्रेस पार्टीचे तालूका अध्यक्ष मंगेश मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष सचिन तोडणकर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (01 ऑगस्ट 2025) महाविकास आघाडीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी दापोली येथील महावितरण कार्यालयात जावून, दापोली तालुक्यात वीज बीलाची शंभर टक्के वसुली असताना देखील मुख्यमंत्र्यांच्या विधिमंडळातील घोषणेला छेद देण्याचे काम दापोली तालुक्यात सुरू असल्याचे विदयुत महावितरण अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. विद्युत ग्राहकांची कोणत्याही प्रकारची संमती अथवा परवानगी न घेताच परस्पर प्री-पेड विदयुत मीटर बसविण्याचा ठेका घेतलेल्या कंपन्यांची माणसे घराघरांत जावून जबरदस्तीने, दमदाटी करून इतकेच नव्हे तर जी घरे बंद आहेत अशा घरात विनापरवाना घुसून विद्युत मीटर बसवित आहेत. त्यामुळे तालुक्यात विद्युत महावितरण विरोधात असंतोषाचे वातावरण पसरले आहे. वीज ग्राहकांच्या सहनशिलतेचा कधीही भडका उडू शकतो याची गंभीर दखल घेवून प्री-पेड विद्युत मीटर बसविण्याची सक्ती ताबडतोब रद्द करावी तशा प्रकारचे निर्देश संबधित कंपन्यांनाही विद्युत महावितरण अधिकाऱ्यांनी द्यावेत, नाहितर निर्माण होणाऱ्या अशांततेच्या वातावरणाला दापोली येथील विद्युत महावितरणच जबाबदार राहील, अशा प्रकारच्या निर्वानीच्या इशाराचे लेखी पत्र महाविकास आघाडीने दिले. हे लेखी पत्र दापोली येथील महावितरणच्या उपविभाग 1 चे उप कार्यकारी अभियंता अरविंद कुकडे तसेच उप विभाग 2 चे उप कार्यकारी अभियंता निलेश बेंडाळे या अधिकाऱ्यांनी स्विकारले.
यावेळी शिवसेना उपजिल्हा महिला संघटीका मानसी विचारे, जिल्हा सरचिटणीस अनिल जाधव, तालूका सरचिटणीस नरेन्द्र करमरकर, माजी नगराध्यक्षा ममता मोरे, शिवसेना शहर प्रमुख संदिप चव्हाण, उपशहर प्रमुख विक्रांत गवळी, रविंद्र घडवले, प्रदिप गमरे, विभाग प्रमुख तृशांत भाटकर, शैलेश पांगत, रमेश भैरमकर, बिपीन ऊर्फ अप्पी मोरे, आतिष घाडगे, साई मोरे, विक्की मोरे, सुभाष दुबळे, साटले, राष्ट्रवादी काँग्रेसचे दापोली तालूका उपाध्यक्ष कुत्तुबद्दीन बर्डे, अल्पसंख्याक अध्यक्ष सईद कोंडेकर, महिला अध्यक्षा निशा सावंत तर काँग्रेस पार्टीचे आणि दापोली पंचायत समितीचे माजी प.स.सदस्य श्रीकांत मुंगसे, घटे आदी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिति होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List