कोकाट्यांचा राजीनामा नाहीच, अजितदादा म्हणतात, आधी शिंद्यांच्या मंत्र्यांचा राजीनामा घ्या, मग बघू!

कोकाट्यांचा राजीनामा नाहीच, अजितदादा म्हणतात, आधी शिंद्यांच्या मंत्र्यांचा राजीनामा घ्या, मग बघू!

विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. कोकाटेंचा राजीनामा घेतला जाईल अशी चर्चा होती, परंतु राजीनाम्यावर आले ते केवळ तंबीवर निभावले. कोकाटे यांनी झालेल्या प्रकाराबद्दल अजितदादांसमोर दिलगिरी व्यक्त केली. त्यावर तुमच्या विधानांमुळे सरकारची बदनामी होत आहे, बोलताना थोडं भान ठेवा अशी समज अजित पवार यांनी दिली. कोकाटेंचे खाते बदला, पण मंत्रीपदावरून हटवू नका, असे मत अजितदादा गटातील नेत्यांनी मांडले होते. अजितदादांनीही त्या मताचा आदर करत मंत्रिमंडळाच्या बैठकीवेळी एक अटच ठेवली. शहासेनेचे कलंकित मंत्री संजय शिरसाट, योगेश कदम यांच्यावर आधी कारवाई करा, मग कोकाटेंचाही फैसला करतो, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडल्याचे समजते.

रमी प्रकरणावरून माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात वादळ निर्माण झाले होते. तत्पूर्वीही त्यांनी शेतकऱयांबद्दल वादग्रस्त विधाने केली होती. सरकारलाही भिकारी म्हटले होते. विरोधी पक्षाने कोकाटे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली होती. अजित पवार यांनी त्यावर कोकाटे यांना आज भेटायला बोलवले होते. त्यांच्या आदेशावरून कोकाटे यांनी आज मंत्रालयात अजित पवार यांच्या अॅण्टी चेंबरमध्ये त्यांची भेट घेतली. सुमारे पंचवीस मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाली. बाहेर पडल्यानंतर कोणाशीही एक शब्द न बोलता कोकाटे मंत्रिमंडळ बैठकीला निघून गेले. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेणार अशी चर्चा सुरू झाली होती.बैठकीत कृषिमंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याचा विषय निघाला. काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण अजित पवार यांनी कोकाटेंचा बचाव केला असे सांगितले जाते.

आज सकाळी कोकाटे यांच्या मतदारसंघातील शेतकऱयांच्या शिष्टमंडळाने कोकाटे चांगले काम करत असल्याने त्यांचा राजीनामा घेऊ नये अशी विनंती आज सकाळी अजितदादांना केली. त्यावर कोकाटे यांना मंत्रीपद दिले तेव्हा आला होतात का असे म्हणत, आता माझ्या हातात काही नाही, असे उत्तर अजित पवार यांनी त्यांना दिले. अजित पवार गटातील नेत्यांनीही कोकाटे यांचा राजीनामा घेऊ नये असे मत व्यक्त केले होते.

…तर माझ्याकडे यायचं नाही, मागं फिरायचं! अजितदादांनी मंत्र्यांना बजावले

अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांना तंबी दिलीच, पण आपल्या गटाच्या सर्वच मंत्र्यांची कानउघाडणी केली. ‘कोकाटेंनी अधिक काळजी घ्यावीच, पण सर्वच मंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भान ठेवावे. अगदीच आवश्यक असेल तरच बोला. उगीच काहीतरी बोलायचे म्हणून बोलू नका. तुमच्या एका शब्दानेही पक्षाची प्रतिमा मलिन होते. यापुढे कुणी काही चुकलं तर माझ्याकडं यायचं नाही तिथूनच मागे फिरायचं, असे अजितदादांनी सर्वांना बजावले.

मुख्यमंत्र्यांची पोकळ तंबी

मंत्र्यांची वादग्रस्त विधाने आणि कृती अजिबात खपवून घेणार नाही. वादग्रस्त विधानांमुळे सरकारची बदनामी होते. शपथा देऊनही तुम्हाला लाज वाटत नाही. तुम्हाला ही अखेरची संधी आहे. यापुढे चुकीला माफी नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सर्वच वादग्रस्त मंत्र्यांनी खरडपट्टी काढली. पण मुख्यमंत्र्यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंसह इतर वादग्रस्त मंत्र्यांना शेवटची संधी देऊन त्यांना पूर्णपणे अभय दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हैदराबाद विमानतळावर 40 कोटींचा गांजा जप्त करत महिलेला अटक हैदराबाद विमानतळावर 40 कोटींचा गांजा जप्त करत महिलेला अटक
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने बुधवारी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका महिला प्रवाशाच्या सामानातून 400 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त केला....
Skin Care – त्वचेवर ग्लो येण्यासाठी अशा पद्धतीने काळजी घ्यायलाच हवी
“कदाचित एक दिवस पाकिस्तान हिंदुस्थानला…”, मोदींच्या मित्राची पाकिस्तानसोबत मोठी डील; हिंदुस्थानला धक्का
वर्धमान ज्वेलर्स चोरीतील दोन आरोपींना अटक; राहुरी पोलिसांची लोणीकंदमध्ये कारवाई; 5 लाखांचा ऐवज जप्त
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 31 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
Central Railway मध्य रेल्वेचा लेट मार्क; प्रवाशांचे हाल
अर्धा किलो सोने जप्त अन् 23 गुन्ह्यांची उकल; चोरट्यांच्या टोळीला अटक, सातारा पोलिसांची कामगिरी