पोलादपूरच्या कापडे गावात विहिरीत केमिकल लोच्या; दूषित पाणीपुरवठ्यामुळे आरोग्य धोक्यात, गावकऱ्यांची पंचायत समितीवर धडक
पोलादपूर तालुक्यातील कापडे बुद्रुक येथील मौजे साई भवानीनगर माळवाडीत चक्क विहिरीत केमिकल लोच्या झाला आहे. या गावातील विहीर आणि बोअरवेलमधून गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही कानाडोळा केला जात असल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी पंचायत समितीवर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला.
साई भवानीनगर येथील विहीर आणि बोअरवेलमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून रसायनयुक्त पाणी येत आहे. हे पाणी नेमके कुठून झिरपत आहे हे कोडेच असून गावकऱ्यांनी उठवलेल्या आवाजानंतर खडबडून जाग आलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जलसंधारण विभागाने विहीर व बोअरवेलमधील पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. मात्र पुढे या नमुन्याची फाईल बाहेरच न आल्याने केमिकल लोच्याचे कारण गुलदस्त्यातच राहिले आहे. त्यातच गावात पाण्याचे दुसरे स्त्रोत नसल्याने नाइलाजाने गावकऱ्यांना हे दूषित पाणी प्यावे लागत आहे.
तत्काळ उपाययोजना करू
गावकऱ्यांच्या निवेदनाची गंभीर दखल घेत गटविकास अधिकारी दीप्ती घाट यांनी तत्काळ उपाययोजना करण्यात येतील असे सांगतानाच पाण्याचे पुन्हा नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात येईल असे आश्वासन दिले. पिण्याच्या पाण्यासाठी पर्यायी काय व्यवस्था करता येईल यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकांचा जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येईल का?
प्रदूषण महामंडळाने नमुने घेऊनही ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत, त्यामुळे गावकरी संतप्त झाले आहेत. पंचायत समितीवर धडक दिलेल्या ग्रामस्थांनी जोरदार घोषणा दिल्या. दूषित पाणी पिऊन लोकांचा जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येईल का, असा सवाल केला आहे. या गंभीर प्रकाराकडे वेळीच लक्ष देऊन मार्ग न काढल्यास तीव्र आंदोलन करू असा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List